नागपूर : समाजकारण, राष्ट्रकारण , विकासकारण आणि सेवाकारण यांचा मिलाफ हे खरे राजकारण. मात्र सध्या जे सुरू आहे, ते फक्त सत्ताकारण आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्यावतीने आयोजित एकल विद्यालयाच्या प्रशिक्षण वर्गाची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गडकरी बोलत होते. ते म्हणाले, सर्व खासदार, आमदार, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनी राजकारणाकडे सेवा म्हणून पाहावे. समाजकारण, राष्ट्रकारण विकासकारण, सेवाकारण हेच आज खरे राजकारण आहे आणि सध्या जे सुरू आहे ते फक्त सत्ताकारण आहे.
हेही वाचा : गडचिरोली : पाण्याच्या शोधात दोन वाघांचा गावात प्रवेश, गावकऱ्यांमध्ये दहशत, पहा व्हिडीओ
आपण सर्वांनी राजकारण करताना त्यासोबत सेवाकारण आणि विकासकारण करणेही आवश्यक आहे आणि त्यामुळेच सामाजिक, आर्थिक बदल घडतील, असे गडकरी म्हणाले. पंडित दीनदयाल उपाध्याय यांनीही समाजातील शेवटच्या माणसाची सेवा करण्याचा मंत्र दिला आहे. ज्या दिवशी अशा गरिबांना रोटी, कपडा आणि राहायला घर मिळेल तेव्हाच त्यांची अंत्योदयची घोषणा पूर्ण होईल असेही गडकरी म्हणाले.