नागपूर : उपराजधानीत कांजण्यांनी (गोवर) डोकं वर काढले आहे. शहरातील विविध भागात बालरोग तज्ज्ञांकडे येणाऱ्या शंभर मुलांपैकी ८ ते १० मुलांमध्ये संक्रमण दिसत आहे. परीक्षेची वेळ जवळ असताना हे रुग्ण वाढल्याने पालकांचीही चिंता वाढली आहे. कांजण्या हा आजार व्हारीसोला झोस्टर विषाणूमुळे होतो. एकदा आजार झाल्यावर परत होत नाही. पण काही व्यक्तींमध्ये हे विषाणू सुप्तावस्थेत राहतात व प्रौढावस्थेत ‘नागीण’ च्या रूपात समोर येतात.
या विषाणूचा शरीरात प्रवेश झाल्यावर १० ते २१ दिवसांत लक्षणे दिसतात. पुढील ५ ते १० दिवसांपर्यंत ही लक्षणे तशीच राहतात. तापाने आजाराची सुरुवात होते. त्यानंतर काही तासात किंवा एकदोन दिवसात डोके, मान किंवा शरीराच्या वरील भागामध्ये तांबूस रंगाचे लहान पुरळ येतात.
हेही वाचा : आमिर खान वर्धा दौऱ्यावर येणार, खास शेती पाहण्यास खेड्यात जाणार …
कोणासाठी धोकादायक?
गर्भवतींना, एचआयव्हीबाधितांना, गंभीर मधुमेहींना व स्टेराॅईडची जास्त मात्र घेणाऱ्यांसाठी कांजण्या धोकादायक ठरू शकतात. रक्तस्त्रावी स्वरूपातील (हेमेरेजिक फार्म) रुग्णांमध्ये त्यामुळे गुंतागुंत वाढू शकते. मुलांच्या तुलनेत प्रौढांमध्ये जास्त समस्या दिसू शकतात. श्वास घेणे कठीण होणे, खूप जास्त डोकेदुखी किंवा स्मृतिभ्रंशाच्या स्थितीत रुग्णांसाठी हा आजार खूप जास्त गंभीर होऊ शकतो.
हेही वाचा : पदव्युत्तर भत्त्याच्या निकषांवर वैद्यकीय शिक्षकांचा आक्षेप; नवीन वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षक मिळणार कसे?
प्रतिबंधात्मक लस घ्या
कांजण्यासाठी सुदृढ बालकांना वैद्यकीय उपचारांची गरज नाही. या आजारात सुटणारी खाज कमी करायला डॉक्टर प्रतिबंधात्मक औषधे देतात. कांजण्या प्रतिबंधात्मक लस घेणे फायद्याचे आहे. लस घेतल्यांमध्ये लक्षणे सौम्य असतात. मुलांना लसीची पहिली मात्रा १२ ते १५ महिन्यांचा असताना, दुसरी मात्रा ४ ते ६ वर्षे वयात दिली जाते.
डॉ. अविनाश गावंडे, बालरोग तज्ज्ञ.