नागपूर : राज्य सरकार आणि अंगणवाडी कर्मचारी संघटना यांच्यातील चर्चा फिस्टकली असून अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या संप लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील चिमुकली मुले अनौपचारिक शिक्षक आणि पोषण आहारापासून आणखी महिनाभर मुकण्याची शक्यता आहे. त्याचा सर्वाधिक फटका अतिदुर्गम भागातील बालक आणि स्तनदा मातांना बसणार आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी ४ डिसेंबर २०२३ पासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यांनी विधानभवनावर शुक्रवारी मोर्चाही काढला. मात्र, राज्य सरकार त्यांच्या मागण्याबाबत सकारात्मक नसल्याचे दिसून येते. सरकारने कर्मचारी संघटनांना कोणतेही आश्वासन दिलेले नाही. अंगणवाडी कर्मचारी मोर्चाहून घरी परतल्या, पण संपावर कायम आहेत.
त्याचा परिणाम ग्रामीण भागात तीन ते सहा वयोगटातील बालके अनौपचारिक शिक्षण, आरोग्याची निगा आणि पोषण आहार यापासून दुरावले आहेत. याशिवाय अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे स्तनदा मातांपर्यंत पोषण आहार पोहचू शकत नाही. आता संपाचा कालावधी वाढत जात असल्याने त्याचा परिणाम बालके आणि स्तनदा मातांवर होण्याची चिन्हे आहेत. राज्यात सुमारे १० हजार ८०० हून अधिक अंगणवाड्या असून दोन लाखांहून अधिक अंगणवाडी कर्मचारी-मदतनीस आहेत. त्यांच्या मार्फत आरोग्य, पोषण आणि शिक्षण विषयक योजनांची अंमलबजावणी होते.
हेही वाचा : अमरावती : महापालिका कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कामकाज ठप्प
परंतु, अंगणवाडी सेविका, कर्मचारी मानधनवाढ, निवृत्ती वेतन, ग्रॅच्युइटी मिळावी यासाठी बेमुदत संप पुकारला आहे. याबाबत नागपूर जनरल लेबर युनियन (सीआयटीयू) नागपूर जिल्हा अध्यक्ष कॉ. राजेंद्र साठे म्हणाले, कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी महिला व बाल कल्याण मंत्र्यांची भेट घेतली. परंतु, सरकार मागण्या मान्य करण्यास तयार नाही.
हेही वाचा : नौदल नागरी परीक्षा ! भरली जाणार नऊशेवर पदे
“अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मार्च २०२३ मध्ये वाढीव मानधन देण्यात आले. पुन्हा त्यांना वाढीव मानधन देणे शक्य नाही. त्यांच्या संघटनांशी अनेक बैठका झाल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार आशा वर्करला वाढीव मानधन देण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे त्यांनाही मानधन वाढवून देण्यात यावे. पण, तसे करणे अशक्य आहे.” – अदिती तटकरे, मंत्री, महिला व बाल कल्याण, महाराष्ट्र राज्य