नागपूर : गृहमंत्र्याचे शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी हत्याकांड घडले. सोमवारी पहाटेच्या सुमारास धंतोतीलीत एका युवकाने एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीचा तलवारीने भोसकून खून केला. मागील तीन दिवसांतील तिसरे हत्याकांड असून या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. अंकुश देवगिरकर (३५) रा. राहुल नगर असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आयूष मंडपे (१९) रा. राहुलनगर याला अटक केली.
यापूर्वी, शनिवारी घडलेल्या हत्याकांडात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आकाश भंडारी व त्याच्या तीन साथीदारांनी मंडपवाल्याकडे मजूर असलेल्या रोहित राजेश तिवारी (२८, वानखेडे आउट,वैशालीनगर) या युवकाचा पैशाच्या वादातून खून केला. तर रविवारी अंबाझरीत दीपक गोविंद बसवंते (२८, रा. पांढराबोडी) याचा कुख्यात प्रशांत ऊर्फ खाटीक गणेश इंगोले (२५, पांढराबोडी), रोशन गणेश इंगोले, राहुल ऊर्फ चोर सूर्यवंशी आणि गजानन शनेश्वर यांनी चौकात खून केला होता.
गेल्या तीन महिन्यांत शहरात हत्याकांड आणि महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था वाऱ्यावर असल्याचे दिसत आहे. धंतोलीतील अंकुश देवगिरकर हा आई आणि बहिणीसह राहत होता. तो कबाडीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने देवगीरकर कुटुंबावर दु:खाचा डोगर कोसळला आहे. आरोपी आयुषला आई-वडिल आहेत. तो बीएस्सी प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. वस्तीत नेहमीच दादागिरी करतो. दारू पिऊन शिवीगाळ करतो. त्याच्या अशा कृत्यामुळे वस्तीतील लोक त्रस्त होते. मात्र, भीतीमुळे त्याला बोलण्याची कोणी हिंमत करीत नव्हते.
घटनेच्या दिवशी म्हणजे रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास अंकुश घराजवळ शतपावली करीत होता. आरोपी आयुष हा दारू पिऊन वस्तीत शिवीगाळ करीत होता. त्यामुळे महिला, युवती आपआपल्या घरी गेल्या. दरम्यान अंकुशने त्याला समजविण्याचा प्रयत्न केला. ‘येथे महिला, युवती आहेत, तू शिवीगाळ करू नको.’ यावरून आयूष संतापला. त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. मोठ-मोठ्याने भांडण होत असल्याने लोक घराबाहेर निघाले.
वाद विकोपाला जाताच आयूषने घरात जाऊन धारदार चाकू आणला. काही कळण्याआधीच अंकुशच्या पोटात भोसकला. रक्ताच्या थारोळ्यात बघून आई आणि बहिण धावत गेली. हा संपूर्ण घटनाक्रम बहुतांश लोकांच्या डोळ्यादेखल घडला. जवळपासच्या लोकांनी त्याला मेडिकल रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तातडीने त्याच्यावर शस्त्रक्रिया केली. त्याचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, सोमवारी सकाळी ८ वाजता त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आला. दरम्यान आरोपी आयूष हा फरार झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्जापूरे यांच्या नेतृत्वातील पथकाने अवघ्या तीन तासांतच त्याचा शोध घेतला. पोलिसांनी त्याला अटक केली.