नागपूर : दिवाळीत देशातील अनेक शहरांमधील हवेतील प्रदूषण धोक्याच्या पातळीवर पोहचले असताना, नागपूर शहरातील प्रदूषण मात्र ‘मध्यम’ या क्रमवारीत होते. दिवाळीनंतर मात्र हवेतील प्रदूषणाच्या पातळीत वाढ होऊन ते ‘वाईट’ या क्रमवारीत पोहोचले. नागपूरसह पुणे आणि मुंबईतील अतिसुक्ष्म धुलीकणांच्या (पीएम २.५) पातळी ५० टक्क्याहून अधिक वाढ दिसून आली.

देशभरातील अनेक शहरांमध्ये दिवाळीच्या दिवशी हवेतील प्रदूषणाचा एक महत्त्वाचा घटक असणाऱ्या अतिसुक्ष्म धुलीकणांच्या पातळीत प्रचंड वाढ दिसून आली. यात विदर्भातील अकोला, अमरावती या शहरांचा देखील समावेश होता. त्याचवेळी तुलनेने सर्वाधिक फटाके फोडल्या गेलेल्या नागपूर शहरात मात्र अतिसुक्ष्म धुलीकणांच्या पातळीत ही वाढ दिसून आली नाही. नागपूर शहर त्यावेळी प्रदूषणाच्या ‘मध्यम’ या क्रमवारीत होते. दरम्यान, दिवाळीनंतर मात्र हेच हवेतील प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या अभ्यासकांनीही आश्चर्य व्यक्त केले. नागपूर शहर हे देशाच्या हृदयस्थानी आहे आणि या शहरात अतिसुक्ष्म धुलीकणांच्या पातळीत ८० टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली. यात महाल आणि रामनगर या दोन केंद्रावर सर्वाधिक प्रदूषण आढळले. शहरातील अतिसुक्ष्म धुलीकणांची(पीएम २.५) पातळी दिवाळीनंतर ५३.५ टक्क्यांनी वाढली. तर सुक्ष्म धुलीकणांचे(पीएम १०) प्रमाण ४३.१ टक्क्यांनी वाढले. शहरातील महाल परिसरात अतिसुक्ष्म धुलीकणांच्या पातळीत दिवाळीपूर्वीपासूनच ८०.९ टक्क्यांनी लक्षणीय वाढ झाली आहे. तर सुक्ष्म धुलीकणांच्या पातळीत ७९.६ टक्क्यांनी वाढली आहे. रामनगर आणि अंबाझरी हा परिसर हवेतील प्रदूषणाबाबत गंभीरपणे प्रभावित झाले.

हेही वाचा :एकदाच मतदान करण्याचा अधिकार…पण, या गावात मात्र दोन वर्षांत चौथ्यांदा…

मुंबई, पुणे आणि नागपूरची स्थिती

मुंबईत ३० ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर या कालावधीत पीएम २.५च्या पातळीमध्ये ५०.३ टक्के वाढ झालेली आढळून आली. पुणे शहरात पीएम २.५ च्या पातळीत १९.७ टक्क्यांनी वाढ झाली. तर नागपूर शहरातही पीएम २.५ च्या पातळीत ५० टक्क्याहून अधिक वाढ झाली.

नागपूरचे चित्र

बुधवारी रात्री आठ वाजता अंबाझरी स्थानकावर अतिसुक्ष्म धुलीकणांचे प्रमाण २११, महाल स्थानकावर ते १४७, सिव्हील लाईन्स स्थानकावर २१४ तर रामनगर स्थानकावर ते २४६ इतके होते. लक्ष्मीपूजनानंतर बुधवारी शहराच्या हवेतील प्रदूषणात झालेली वाढ आश्चर्यचकीत करणारी आहे.

हेही वाचा :Video: ताडोबात ‘बिजली’ची डौलदार चाल…हिरव्या रानवाटेवर बछड्यांसह…

दिवाळीनंतर वाढ आश्चर्यकारक

दिवाळीत सर्वाधिक फटाके फुटूनसुद्धा प्रदूषण कमी आणि दिवाळी संपल्यानंतर मात्र प्रदूषणात वाढ हे थोडे आश्चर्यकारक आहे. त्यामुळे शहरातील हवेतील प्रदूषण माेजणारी यंत्रणा पुन्हा एकदा तपासण्याची गरज निर्माण झाली आहे, असे ग्रीन व्हिजिल फाउंडेशनचे संस्थापक कौस्तुभ चटर्जी म्हणाले.