नागपूर : उपराजधानीत करोना नियंत्रणात आल्यावर सर्वसामान्यांनी सुटकेचा श्वास घेतला असतानाच आता ‘स्वाईन फ्लू’ने नागपूरकरांची चिंता वाढवली आहे. नववर्षात शहरातील विविध रुग्णालयात या आजाराने तब्बल दोन बळी घेतले आहे. नागपुरात दगावणाऱ्या रुग्णामध्ये अजनीतील एका ५७ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. त्यांच्यावर किंग्जवे रुग्णालयात उपचार सुरू होते. तर दुसरा मध्यप्रदेशातील मुलताईच्या ६७ वर्षीय रुग्णावर मेडिट्रिना रुग्णालयात उपचार सुरू होते. दोघांचा मृत्यू जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात नोंदवला गेला.
दोघांना ताप, थंडी वाजणे, कफ आणि घसादुखी, अंगदुखी, डोकेदुखी, खूप जास्त थकवा येणे, डायरिया, उलट्यापैकी एक वा अधिक लक्षणे होती. प्रथम दोन्ही रुग्णांनी स्थानिक डॉक्टरांकडून उपचार घेतले. उपचारानंतरही दोघांची प्रकृतीत खालावतच असल्याने त्यांना नातेवाईकांनी मोठ्या खासगी रुग्णालयात दाखल केले. येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. १ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२४ दरम्यान नागपुरात या आजाराचे तब्बल १४ नवीन रुग्ण नोंदवले गेले आहे.
हेही वाचा : भंडारा : दोनशेच्यावर संतप्त कामगारांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला, काय आहे कारण जाणून घ्या…
स्वाईन फ्लू म्हणजे काय?
स्वाईन फ्लू हा डुकरांद्वारे पसरणारा संसर्गजन्य रोग आहे. हा रोग संक्रमित मानव किंवा प्राण्यांद्वारे पसरतो. हा रोग संक्रमित व्यक्तीच्या शिंकताना आणि खोकताना सोडलेल्या थेंबांद्वारे तसेच संक्रमित पृष्ठभागाच्या संपर्काद्वारे पसरतो. त्याची लक्षणे इन्फ्लूएंझासारखीच असतात. हा विषाणू नाक, घसा आणि फुफ्फुसांच्या रेषेत असलेल्या पेशींना संक्रमित करतो. या संसर्गाची लक्षणे सौम्य आणि गंभीर दोन्ही असू शकतात.
हेही वाचा : मांजात अडकलेल्या पोपटाचा जीव वाचवण्यासाठी मेट्रो धावली
गेल्यावर्षीही रुग्णसंख्या अधिक
पूर्व विदर्भात गेल्यावर्षीही (२०२३) स्वाईन फ्लू रुग्ण मोठ्या संख्येने आढळले होते. या भागात १ जानेवारी ते ३ सप्टेंबर २०२३ दरम्यान या आजाराचे ४१ रुग्ण आढळले होते. त्यापैकी सर्वाधिक ३३ रुग्ण नागपूर शहरातील होते.
हेही वाचा : नागपूर : कारागृहातून सुटताच प्रियकराने थेट प्रेयसीच्या अंगावर घातली कार
स्वाईन फ्लू कसा पसरतो..
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, एच १ एन १ विषाणूने शरीरात प्रवेश केल्यानंतर १ ते ७ दिवसांच्या कालावधित रुग्ण स्वाईन फ्लू संक्रमित होतो. लक्षणं दिसू लागल्यानंतर पुढील सात दिवस रुग्ण हा आजार दुसऱ्यांमध्ये पसरवू शकतो. लहान मुलं दीर्घकाळ स्वाईन फ्लूचा संसर्ग पसरवू शकतात. इन्फ्लूएन्झा विषाणूचे विविध प्रकार आहेत. कमी-जास्त प्रमाणात हे विषाणू गंभीर आजारासाठी कारणीभूत ठरतात.