नागपूर: महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची ओळख होती. परंतु अलीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्षांमध्ये सरकारची गणित जुळवून आणल्यानंतर थेट एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून दाखवले. त्यानंतर दोन वर्षांनी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला कमी जागा मिळाल्या असल्या तरीही सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड मोठ्या संख्याबळाने मुसंडी मारत त्यांचा पक्ष आज सत्तेवर आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजकारणात चाणक्य असले तरी, त्यांच्या शालेय जीवनात ते गणितात प्रचंड कच्चे होते, असा किस्सा खुद्द त्यांनी सांगितला. काय आहे हे प्रकरण बघूया…

सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सोमवारी सकाळी इयत्ता पहिली ते तिसरी साठी तयार करण्यात आलेल्या वैदिक गणिताच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, भारती कृष्ण तीर्थ महाराज यांनी वैदिक गणिताची केलेली रचना अत्यंत सोपी आहे. यामुळे संगणकाचा वापर करूनही न सोडवता येणारे गणित अगदी सोप्या पद्धतीने सोडवले जाऊ शकते. ते अत्यंत ते प्रचंड साधारण व्यक्तिमत्व होते. विदेशात जाऊनही त्यांनी विज्ञान आणि गणितावर अनेक व्याख्याने दिली. वेदांचा अभ्यास करून त्यातून त्यांनी गणिताला समोर आणले असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पारंपरिक ज्ञान मुद्रित करण्यात कमी पडलो

भारतीय संस्कृतीचा इतिहास प्रचंड मोठा आहे. जगामधील अनेक सभ्यता नष्ट झाल्या होत्या. त्यापूर्वी आमची भारतीय सभ्यता सर्वांसमोर आदर्श होते. याची अनेक उदाहरणे दिसून येतात परंतु, आमचे पारंपारिक ज्ञान आणि सभ्यता मुद्रित स्वरूपात जपून ठेवण्यात आम्ही कमी पडलो अशी खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. आज वैदिक गणिताच्या पुस्तकाच्या माध्यमातून ती समोर येत असून ही आनंदाचे बाब आहे. यामुळे येणाऱ्या पिढीला आपले पारंपारिक ज्ञान शिकता येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री नेमके काय म्हणाले?

शाळेमध्ये असताना गणित या विषयाचे खूप भीती वाटत होती. दहावीपर्यंत गणित पास झालो. परंतु अकरावी मध्ये विज्ञान शाखेत प्रवेश करत असताना गणित सोडून कुठला विषय घेता येईल याचा पहिले शोध घेतला आणि गणित ऐवजी अर्थशास्त्र हा विषय घेतला. यावेळी जर वैदिक गणित राहिले असते, गणिताची भीती वाटली नसती असेही मुख्यमंत्री म्हणाले.