नागपूर : नागपुरात १५ ऑगस्टच्या रात्रीपासून शुक्रवारदरम्यान (१८ ऑगस्ट) ‘सीएनजी’च्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे शुक्रवारी नागपुरात सीएनजीचे दर प्रति किलो ८९ रुपये ९० पैसे एवढे नोंदवले गेले.
नागपुरात १५ ऑगस्टपर्यंत सीएनजीचा दर ९९ रुपये ९० पैसे प्रति किलो एवढा होता. तर गेल्यावर्षी या काळात नागपुरात सीएनजीचा दर १२० रुपये प्रति किलो होता. त्यामुळे गेल्यावर्षी देशात सर्वात महाग सीएनजी नागपुरात असल्याचे समोर आले होते. परंतु त्यानंतर काहीशी घसरण होऊन आधी ११६ रुपये प्रति किलो आणि नंतर १०६ रुपये प्रति किलो अशी टप्प्याटप्प्याने सीएनजीच्या दरात घसरण झाली आहे.
हेही वाचा : विद्यादानाचे काम सोडून हे काय भलतंच..; गुरुजींना ऐकावे लागताहेत टोमणे
दरम्यान नागपुरात मोठ्या संख्येने ऑटो सीएनजी वर चालतात. त्यामुळे ऑटो चालकांना या दर घसरणीमुळे मोठा फायदा होत आहे. तर शहरात हळू- हळू सीएनजीवर धावणाऱ्या चारचाकी वाहनांचीही संख्या वाढत आहे. सीएनजीचे दर घसरल्याने या वाहन चालकांनाही लाभ होणार आहे.