नागपूर : जनतेच्या पैशाची उधळपट्टी, सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ सध्या सुरू आहे. भारत सरकार ऐवजी मोदी सरकार, असा उल्लेख या यात्रेच्या निमित्ताने करणे हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. सरकारच्या या गैरप्रकाराला जनतेतून प्रचंड विरोध होत आहे. या विरोधाला घाबरून ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ पोलीस बंदोबस्तात काढण्याची नामुष्की सरकारवर ओढवली असल्याची खरमरीत टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्र सरकारच्या प्रचार, प्रसिद्धीसाठी सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या वाहनावर ‘मोदी सरकारची हमी’ असे शब्द लिहिले असल्यामुळे लोकांचा विरोध वाढत आहे. या योजना भारत सरकारच्या आहेत की मोदी सरकारच्या, असा सवाल जनता विचारत आहे. सरकारी यंत्रणांचाही या यात्रेच्या नियोजनासाठी वापर होतोय. त्यामुळे शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्याचबरोबर शेतकरी, युवकांची प्रचंड नाराजी आहे. आतापर्यंत विदर्भ, मराठवाडा तसेच कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, नाशिक, नंदुरबार, सातारा या जिल्ह्यांत यात्रेला विरोध झाला आहे. जनतेचा विरोध पत्करून, ही यात्रा सुरू असून जनता सरकारला धडा शिकवेल, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

हेही वाचा : ट्रक चालकांच्या आंदोलनावर फडणवीस म्हणाले, “माहिती घेतो त्यानंतर…”

वडेट्टीवार म्हणाले की, शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वापर पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे प्रचारासाठी केला जातोय. राजकीय कार्यक्रमात सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊ नये. परंतु असे असताना सध्या या नियमांचे उल्लंघन करत, ही यात्रा सुरू आहे. पोलीस बंदोबस्तात प्रचार, प्रसिद्धी करण्याची वेळ सरकारवर आली आहे. यासारखं दुर्दैव नाही. ही यात्रा म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळफेक आहे. त्यामुळे जनता आता या भूलथापांना बळी पडणार नाही. विकसित भारत संकल्प यात्रेला जनतेतून होणारा विरोध म्हणजे सरकारचे दिवस आता भरले आहेत. अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी सरकारवर टिकास्र डागले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur congress leader vijay wadettiwar criticises bjp for viksit bharat sankalp yatra rbt 74 css
Show comments