नागपूर : जरांगे पाटील आंदोलन करीत असलेल्या जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पोलिसांनी लाठीमार केला होता. यासंदर्भात माहितीच्या अधिकारात काही बाबी समोर आल्या आहेत. मराठा आंदोलकांवर लाठीमार कोणी केला, हे मनोज जरांगे पाटील बघतील. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करणे ही बाब अयोग्य आहे. आपण या घटनेचे समर्थन करू शकत नाही, अशी भूमिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी नागपूर येथे मांडली.
मराठ्यांवर लाठीमार निषेधाची बाब आहे. तो काही कौतुकास्पद विषय नाही. परंतु, तो नेमका कुणी केला, हे जरांगे पाटील शोधून काढतील किंवा सरकार त्याबद्दल खुलासा करेल. अंतरवाली सराटी येथील पोलिसांनी केलेला लाठीमार दुर्दैवी होता, असे आपले ठाम मत आहे. हे कृत्य टाळता आले असते. एवढे मोठे आंदोलन सुरू असताना सरकारला त्याबद्दल कळत नाही आणि स्थानिक पातळीवर अधिकारी निर्णय घेत असतील, तर हे सरकारचे अपयश आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचा : “गृहखाते सांभाळण्यात फडणवीस नापास”, सुषमा अंधारेंची टीका, म्हणाल्या, “मुख्यमंत्री बग्गीतून शेतात जातात…”
अंतवाली सराटी येथील अधिकारी व सरकार मराठा आंदोलन हाताळण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरले. लाठीमार झाल्यानंतर आंदोलन आणखी पेटले. सरकारला हेच पाहिजे होते काय, असा सवालही वडेट्टीवार यांनी केला. पोलिसांनी महिलांवर अमानुष हल्ला केला. पोलिसांनाही दुखापत झाले. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी झाली पाहिजे. सरकार ती करणार नसेल तर नागपुरातील हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला जाईल, असे वडेट्टीवार म्हणाले.