नागपूर : कोळशावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पांचा नागपूर शहर व परिसरातील हवेच्या गुणवत्तेवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केल्याशिवाय वीज प्रकल्पाचा विस्तार करू नये, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विशाल मुत्तेमवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटने (सीएसई) नुकत्याच केलेल्या अभ्यासात दिल्ली-एनसीआर क्षेत्रातील वायुप्रदूषण वाढविण्यात कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्प कारणीभूत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तेथील ११ औष्णिक वीज प्रकल्पपैकी सध्या दोन वीज प्रकल्पामध्ये सल्फरडाय ऑक्साईड नियंत्रणासाठी उपाययोजना केली आहे. मात्र, नागपूरमध्ये औष्णिक वीज विस्ताराच्या तयारीत असताना विद्यमान ऊर्जा प्रकल्प आवश्यक सल्फरडाय ऑक्साइड नियंत्रण उपायांशिवाय कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : लग्न करणे सोपे मात्र विवाह प्रमाणपत्र मिळवणे कठीण; काय आहे वाचा…

हेही वाचा : “ही तर पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना”, रामटेकच्या घटनेवर प्रतिक्रिया

फ्लू गॅस डिसल्फ्युरायझेशन (एफजीडी) हे ऊर्जा संयंत्राद्वारे उत्सर्जित होणाऱ्या वायूंमधून सल्फरडाय ऑक्साइड काढून टाकण्यासाठी विकसित केलेले तंत्रज्ञान आहे. २०११ च्या राज्य शासन निर्णयानुसार ऊर्जा प्रकल्पामध्ये एफजीडी तंत्रज्ञान बसविणे अनिवार्य आहे. परंतु, याबाबत कोणत्याही उपाययोजनांचे पालन न करता नागपुरातील वीज प्रकल्प दशकाहून अधिक काळ कार्यरत आहेत. नागरिकांच्या आरोग्याचे गांभीर्य लक्षात घेता कोळशावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्प हवेच्या गुणवत्तेवर काय परिणाम करतो, याबाबत विश्लेषण करण्यासाठी सीएसई अभ्यासाप्रमाणेच नागपुरात सर्वसमावेशक अभ्यास करणे अत्यावश्यक आहे. जोपर्यंत असा अभ्यास आणि योग्य उपाययोजना केल्या जात नाहीत, तोपर्यंत नागपुरात सुरू असलेल्या औष्णिक वीज प्रकल्पाचा विस्तार थांबविण्याचा सल्ला मुत्तेमवार यांनी दिला आहे. सार्वजनिक आरोग्याशी तडजोड करणा-या कोणत्याही विकासाचे परिणाम गंभीरच होतील, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur congress leader vishal muttemwar letter to dcm devendra fadnavis air quality check before expansion of power project rgc 76 css