नागपूर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दक्षिण नागपूर मतदारसंघात मताधिक्य अपेक्षित होते, परंतु काँग्रेस पिछाडीवर गेल्यानंतर प्रदेश काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात नवीन चेहऱ्याच्या शोधात असल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना चांगली लढत दिली. भाजपला अपेक्षित मताधिक्य मिळू दिले नाही. पण, काँग्रेसला दक्षिण नागपूरमध्ये जेवढ्या मतांची अपेक्षा होती. त्यापेक्षा बरीच कमी मिळाली. काँग्रेसने या कारणांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण नागपुरात काँग्रेससाठी अनुकूल वातावरण असताना २०१९ पेक्षा कमी मते मिळाली. हे चित्र बदलण्यासाठी काँग्रेस आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नवीन चेहरा शोधत असल्याची माहिती आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर नागपूर शहर काँग्रेससाठी सातत्याने अनुकूलहोत गेले आहे. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर, पश्चिम नागपूरमध्ये काँग्रेस विजयी झाली. तर दक्षिण आणि मध्य नागपूरमध्ये अतिशय अल्प मतांनी काँग्रेसचा पराभव झाला होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेसला २०२४ च्या लोकसभेत दक्षिण नागपूरमधून भरघोस मतांची अपेक्षा होती. मात्र, या मतदारसंघात काँग्रेस पिछाडीवर गेले. ही बाब प्रदेश काँग्रेसच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे जेथे-जेथे अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली. तेथे विधानसभेत नवीन चेहरा देण्यात येईल. काँग्रेस आगामी विधानसभेत नागपुरातील सर्व सहा जागा जिकण्याच्या दृष्टीने तयारी करीत आहे. त्यासाठी उमेदवारांची अदलाबदल आणि नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार करीत असल्याचे सांगण्यात आहे.

हेही वाचा : बुलढाणा: सायबर गुन्हेगाराचे गुजरात कनेक्शन; आरोपी वडनगर…

लोकसभा निवडणुकीत नागपुरात काँग्रेसचे सर्व गट एकत्र आले होते. त्याचा परिणामही दिसून आला. गडकरी यांना ५ लाखांचे मताधिक्य अपेक्षित होते. मात्र, त्यांना दीड लाखांचे मताधिक्य देखील गाठता आले नाही. आता विधानसभेसाठी वेगळी रणनिती आखण्यात येत असून भाजपला जेथे मताधिक्य मिळाले. त्या ठिकाणी तगडा उमेदवार देण्यात येणार असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा : नागपूर : ब्युटीपार्लरच्या नावावर तीन तरुणींकडून देहव्यापार, नेचर ब्युटी सलूनवर एसएसबीची धाड

दरम्यान, काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनी दिलेल्या मुलाखतीमध्ये नागपूर शहरात काँग्रेसची स्थिती मजबूत आहे. शहरातील सहा विधानसभा मतदारसंघात ६० उमेदवार इच्छूक आहेत. ज्या उमेदवाराची निवडणूक येण्याची शक्यता अधिक असेल, त्याला पक्षांकडून उमेदवारी मिळेल, असे स्पष्ट केले होते. काँग्रेसने सहा मतदारसंघासाठी इच्छुकांकडून अर्ज मागवले आहे. येत्या १५ ऑगस्टपर्यंत अर्ज देवडीया काँग्रेस भवनात उपलब्ध केले जात आहेत. दोनशे रुपये शुल्क भरून अर्ज घ्यायचा आहे. त्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराला २० हजार रुपये पक्षनिधीसह अर्ज प्रदेश काँग्रेसकडे सादर करावयाचा आहे. महिला आणि अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील उमेदवाराला दहा हजार रुपये पक्षनिधी पक्षाकडे जमा करायचे आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur congress looking for new face for south nagpur assembly constituency ahead of assembly elections 2024 rbt 74 css