नागपूर : मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट मालिकेतील मुख्य आरोपी आणि दाऊद इब्राहिमचा राइटहँड समजला जाणारा सलिम कुत्ता याची १९९८ मध्येच रुग्णालयात हत्या झाली होती, असा खळबळजनक दावा आमदार कैलास गोरंट्याला यांनी विधानभवन परिसरात केला. आमदार नितेश राणे या सलीम कुत्तावरून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत आहे. गृहमंत्र्यांनी या सलीम कुत्ताप्रकरणी सविस्तर माहिती द्यावी, अशी मागणीही आमदार गोरंट्याला यांनी केली आहे.
हेही वाचा : पुसदच्या पाणी पुरवठा योजनेवरून सत्ताधारी खासदार-आमदारांतच वाद पेटला
रोहित वर्मा, बाळू ठाकरे, संतोष शेट्टी यांनी सलीम कुत्ताची हत्या केली. सलीमला तीन बायका होत्या. टाडा कोर्टात त्याच्या तीनही बायकांनी आमचा पती सलीम कुत्ता मेला असून आमची संपत्ती परत करा, अशी विनंती केली होती. त्यानुसार न्यायालयाने जप्त केलेली संपती सलीम कुत्ताच्या कुटुंबीयांना परत केली होती. परंतु, आमदार नितेश राणे यांनी सलीम कुत्तासाठी आयोजित पार्टीचा फोटो दाखविले आहे. तसेच हा सलीम कुत्ता १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी असल्याचा दावा करताहेत, तो नेमका कोण, याबाबत गृहमंत्र्यांनी सविस्तर माहिती द्यावी, असे आमदार गोरंट्याल म्हणाले.