नागपूर: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजपने पक्षात घेऊन काँग्रेसला राजकीय धक्का देण्याचा प्रयत्न केला असला तरी प्रत्यक्षात तो खरच बसणार आहे का, हे पाहणे ऊत्सूकतेचे राहणार आहे. विदर्भातील विकास ठाकरे ( नागपूर), राजू पारवे (उमरेड) आणि अमित झनक ( रिसोड) या काँग्रेस आमदारांनी पक्षासोबत राहणार असे स्पष्ट केले आहे . त्यामुळे भाजपकडून काँग्रेसला खिंडार पाडले या प्रचाराला चाप बसला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशोक चव्हाण यांनी काल भाजप प्रवेश केला. त्यापूर्वी त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. तेव्हापासून त्यांच्या सोबत काँग्रेसचा एक गट बाहेर पडणार अशा बातम्या भाजप वर्तुळातून पसरवल्या जात आहेत. आमदारांची नावे सांगितली जात आहे. काल मंगळवारी चव्हाण यांनी भाजप प्रवेश केल्यावर हळूहळू चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. काँग्रेसने आमदारांशी संपर्क साधून त्यांचा कल जाणून घेतला. ज्यांना जायचे त्यांनी स्पष्ट सांगावे, कोणाला थांबवणार नाही असे सांगण्यात आले. त्यानंतर अनेकानी आपण काँग्रेससोबत राहणार असे स्पष्ट केले. त्यात विदर्भातील विकास ठाकरे ( नागपूर), राजू पारवे (उमरेड) आणि अमित झनक ( रिसोड) या आमदारांचा समावेश आहे

हेही वाचा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा स्थगित; ‘या’ दिवशी येण्याची शक्यता

अशोक चव्हाण यांच्या पक्षपवेशाला भाजपचा एकही दिल्लीतील वरिष्ठ नेता उपस्थित नव्हता. ज्या नेत्यांच्या उपस्थितीत पक्षपवेश सोहळा झाला ते चव्हाण यांना राजकारणात कनिष्ठ आहेत. भाजपने चव्हाण यांचा पहिल्याच दिवशी मान राखला नाही, असा संदेश राजकीय वर्तुळात गेला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीपर्यंत काँग्रेसमध्ये फूट पडणार असे सांगत राहून संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र आमदारांनी जाहीरपणे पुढे येत पक्षातच राहणार अशी भूमिका मांडल्याने भाजपची अडचण झाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur congress mla vikas thackeray mla raju parwe and mla amit zanak said that they will not leave congress cwb 76 css