नागपूर : प्रदेशाध्यक्षाच्या निर्देशानुसार वेळोवेळी निदर्शने, मोर्चे, धरणे, सभा आयोजित करण्यात पुढाकार आणि सक्रीय सहभागी होणारे कार्यकर्ते महापालिका निवडणुकीत उमेदवारी देताना दुर्लक्षित राहतात, अशी तक्रार काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी केली. येथील महाकाळकर सभागृहात काँग्रेसची बैठक झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री राजेंद्र मुळक, आमदार ॲड. अभिजीत वंजारी उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.
प्रदेशाध्यक्षांच्या निर्देशानुसार शहरात आंदोलने, मोर्चे काढले आणि काँग्रेस पक्षाला मजबूत केले. जो कार्यकर्ता परिश्रम करतो, पक्षाच्या कार्यकक्रमाला तत्पर राहतो. त्याच्या गुणवत्तेचा विचार झाला पाहिजे, परंतु तसे होत नाही. अशा मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळत नाही, अशी खंत ठाकरे यांनी व्यक्त केली. पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना सभेमध्ये सहभागी करवून घेतले पाहिजे. त्यांनी त्याची चित्रफीत तयार करावी. त्यामुळे त्याच्या कार्याची नोंद घेणे सोपे होईल, असे ठाकरे म्हणाले.