नागपूर : ग्राम पंचायतीचे निकाल सोमवारी जाहीर झाले. या निवडणुका पक्षचिन्हांवर होत नसल्या तरी राजकीय पक्षाचे समर्थक गट त्यात सहभागी होतात व त्यांचा जय-पराजय हा संबंधित पक्षाचा मानला जातो. भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गाव धापेवाड़ामध्ये काँग्रेस समर्थित गटाने १७ पैकी १० जागांवर विजय मिळवला. भाजप समर्थित गटाला सहा जागांवर समाधान मानावे लागले. धापेवाडामध्ये सरपंचपदासाठी काँग्रेस विरुद्ध भाजप समर्थित गटात थेट लढत झाली.
त्यात कांग्रेस समर्थित मंगला शेटे यांनी भाजपा समर्थित उमेदवार निशा खडसे यांचा पराभव केला. धापेवाडा हे गाव सावनेर तालुक्यात येत असून या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व कांग्रेस नेते आमदार सुनील केदार करतात. त्यांचा या भागात प्रभाव आहे. निवडणुकीपूर्वीही धापेवाड्यात काँग्रेस समर्थित गटाचीच सत्ता होती. या निवडणुकीत त्यांनी ती कायम राखली. नागपूर जिल्ह्यातील ३५७ ग्रामपंचायतीमध्ये रविवारी सरपंच व सदस्य पदासाठी ७९.४० टक्के मतदान झाले. सोमवारी तालुकास्तरावर मतमोजणी पूर्ण झाली.
हेही वाचा : नागपूर : अपंगांच्या सेवेसाठी कृत्रिम अवयव मोबाईल व्हॅन सज्ज
भाजपचा दावा
जिल्ह्यात ७० टक्के गावात भाजप समर्थित गटाचे सरपंच विजयी झाल्याचा दावा या पक्षाचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी केला.