नागपूर : लोकशाहीत मतदान हे महत्वाचे अस्त्र आहे. परंतु अलिकडे भारतात सर्वसामान्यांचे हे अस्त्रच बोथट करण्यात आल्याचा आरोप होत आहे. ईव्हीएमच्या माध्यमातून केवळ नावापुरती मतदान प्रक्रिया रावबण्यात येत आहे. ही लोकशाहीची हत्या आहे. त्यामुळे ईव्हीएमद्वारे निवडणुका घेणे बंद करून मतपत्रिकेवर निवडणुका घेतल्या जावे, अशी मागणी काँग्रेस विचार जगजागृती अभियानाने केली आहे. त्यासाठी कार्यकत्यांनी नागपुरातील व्हेरायटी चौकात निदर्शने केली.
काँग्रेस विचार जगजागृती अभियानतर्फे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी ईव्हीएममधील मते आणि प्रत्यक्ष झालेले मतदान हे वेगेवगळे आढळून आले. तसेच रात्रीच्या वेळी अचानक मतदानाची टक्केवारी वाढली. त्यामुळे ईव्हीएमवर प्रश्न निर्माण झाले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर ६ महिन्यांपासून राज्यात विधानसभा निवडणुका घेण्याचे धाडस भाजप दाखवत नव्हती. म्हणूनच निवडणुकीची तारीख पुढे ढकलण्यात आली. पण महायुतीविरोधी वातावरण असतानाही अचानक प्रचंड एकतर्फी बहुमत महायुती आणि त्यातही भाजपला कसे काय मिळाले, असा सवालही अभियानच्या पदाधिकाऱ्यांनी केला. या आंदोलनात संघटनेचे समन्वयक तनवीर अहमद, प्रवक्ते ॲड. शिरीष तिवारी, माजी नगरसेवक वासुदेव ढोके सहभागी झाले होते.
हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या शहरात १५ हजार कोटींची गुंतवणूक; तब्बल ४५० एकर जमिनीवर…
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर यांनी ईव्हीएम मध्ये ७६ लाख मतांच्या वाढीबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते. अभिनेत्री स्वरा भास्कर यांनीही विचारले की, तीन दिवसांनंतरही ईव्हीएम ९९ टक्के चार्ज कशी काय होती? त्यामुळेच ईव्हीएम फॉर्म क्रमांक १७ सी पेक्षा जास्त मते दाखवत होते. यावरून हे समजते की भाजपचा एकतर्फी विजय हा लाडकी बहीण योजनेचा नसून लाडक्या ईव्हीएमचा चमत्कार आहे. एका उमेदवाराला त्याच्या गावातही मते मिळाली नाहीत, मनसेच्या उमेदवाराला फक्त दोन मते मिळाली, कुठे दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाली, तर कधी एकूण मतांची संख्या मतदानापेक्षा जास्त होती, ही लोकशाहीची निव्वळ हत्या आणी संविधानाशी खेळ असल्याचा आराेप यावेळी करण्यात आला.
हेही वाचा : नागपूरच्या पालकमंत्रीपदावरून तर्कवितर्क
राज्यातील निवडणुकीच्या निकालाने दुखावलेले ९५ वर्षीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव हे ईव्हीएमवर बंदी घालण्यात यावी आणि निवडणुकीतील अदानींच्या कोट्यावधी रुपयांच्या गुंतवणुकीची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी तीन दिवस आंदोलनाला बसले. मोदी या विषयी काहीच बोलत नाहीत. यावरून मोदी अशा कामांना मूक संमती देतात आहेत, असे माजी नगरसेवक व संघटनेचे समन्वयक तनवीर अहमद म्हणाले.