नागपूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी- अधिकारी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याच्या मागणीसाठी २५ ऑक्टोबरला सुरू झालेल्या संपात गुरूवारी (२६ ऑक्टोबर) सामुदायीक आरोग्य अधिकाऱ्यांनी उडी घेतली. पूर्व विदर्भातील ४,३३५ कर्मचारी संपात असल्याने येथील रुग्णसेवा सलाईनवर असल्याचे चित्र आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत आयुषअंतर्गत काम करणारे डॉक्टर्स, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेअंतर्गत डॉक्टर्स, क्षयरोग विभागातील कर्मचारी व तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि अर्धपरिचारिका, समुदाय वैद्यकीय अधिकारी तसेच अन्य आरोग्य कर्मचारी असे एकूण ५ हजार ३८६ कंत्राटी अधिकारी- कमर्चारी कार्यरत आहे. त्यापैकी ४ हजार ३३५ अधिकारी- कर्मचारी गुरूवारी संपात होते.
हेही वाचा : अमरावती: मेळघाटातील सुसर्दा वन परिक्षेत्रात वाघाचा मृत्यू
दरम्यान एक दिवसापूर्वी बुधवारी सुरू झालेल्या संपात सामुदायीक वैद्यकीय अधिकारी संपात नव्हते. परंतु गुरूवारी पूर्व विदर्भातील १ हजार ४१ सामुदायीक वैद्यकीय अधिकारीही संपात उतरले. त्यामुळे पूर्व विदर्भातील सार्वजनिक आरोग्य विभागातील रुग्णालयातील डायलेसीससह इतरही बऱ्याच सेवा विस्कळीत होण्याचा धोका आहे. या विषयावर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नागपूर विभागाच्या आरोग्य उपसंचालक डॉ. कांचन वानरे म्हणाल्या, पूर्व विदर्भातील सर्वच जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकांना गरजेनुसार झटपट रोजंदारी पद्धतीवर डायलेसिस तंत्रज्ञानासह इतरही कर्मचारी घेण्याच्या सूचना केल्या आहे. त्यामुळे सध्या कुठेही अनुचित प्रकार घडल्याची माहिती नाही.
हेही वाचा : “माळ घालाल तर घरी येतो…” सातारकर महाराजांच्या नागपुरातील या आहेत आठवणी….
सर्वत्र रुग्णांना चांगल्या सेवा दिल्या जात आहे. तर आंदोलकांनी ओडिशा, पंजाब, राजस्थान, मणिपूरसह इतर काही राज्यांमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांना तेथील शासनाने स्थायी केले. त्यानुसार महाराष्ट्रातही स्थायी केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा दावा केला आहे.