नागपूर : पेट्रोलियम अँड एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायजेशन कार्यालयाच्या (पेसो) दोन अधिकाऱ्यांना १० लाखांची लाचेची रक्कम पुरविणारा दलाल प्रियदर्शन देशपांडे यांचे ‘वेस्टर्न कोल्डफिल्ट लिमीटेड’ (वेकोली) कंपनीशी तार जुळलेले आहेत. त्यामुळे आता वेकोलीचेही काही अधिकारी सीबीआयच्या रडारवर आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी सीबीआयने राजस्थानच्या केमीकल कंपनीला अतिरिक्त डिटोनेटर्स बनविण्याची परवानगी देण्यासाठी १० लाखांची लाच घेणाऱ्या पेट्रोलियम अँड एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायजेशन कार्यालयाचे (पेसो) दोन उपमुख्य नियंत्रक अधिकारी अशोक दलेला आणि विवेक कुमार, कंपनीचा संचालक देवीसिंह कच्छवाह आणि प्रियदर्शन देशपांडे यांना सीबीआयने अटक केली. त्यात लाचखोरीचा मुख्य दलाल म्हणून प्रियदर्शन देशपांडे (रा. लक्ष्मीनगर) हा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघात भाजपकडून धक्कातंत्र; भावना गवळी यांच्या ऐवजी महायुतीकडुन एका बड्या नेत्याच्या नावाची चर्चा !

त्याचे पेसो कार्यालयाजवळ झेरॉक्सचे दुकान आहे. मात्र, गेल्या १५ ते २० वर्षांपासून देशपांडे हा पेसो कार्यालयातील लाचखोर अधिकाऱ्यांना हाताशी धरून देशातील जवळपास सर्वच स्फोटक निर्मिती कंपन्यांसाठी कोट्यवधी रुपयांची दलाली करतो. केंद्रीय अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून लाचेची मागणी करणे आणि लाचेची रक्कम अधिकाऱ्यांना पोहचवून देण्याचे काम देशपांडे करतो. त्यामुळे देशपांडे हा नेहमीच पेसोच्या कार्यालयात बसतो. त्याची विशेष व्यवस्था पेसो कार्यालयाने केली आहे. तसेच त्याचे गेल्या काही वर्षांपासून वेकोलीच्या कार्यालयातही बसत असून काही अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आणि घरी येणे-जाणे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पेसो अधिकाऱ्यांप्रमाणेच वेकोलीमध्येही लाचेची मागणी करणे आणि रक्कम अधिकाऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम देशपांडे करीत असल्याची शक्यता नकारता येत नाही, अशी सूत्रांनी दिली. त्यामुळे पेसो कार्यालयातील अन्य अधिकाऱ्यांसह आता ‘वेकोली’चेही अधिकारी सीबीआयच्या रडारवर असल्याची माहिती आहे. या प्रकरणी सीबीआयचे उपमहानिरीक्षक एम.एस. खान यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

हेही वाचा : महिला सशक्तीकरणासाठी गडचिरोलीत येणारे सरकार ‘साधना’ला न्याय देणार काय ? ९ जानेवारीला मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

देशपांडेचा सात कोटींचा बंगला

प्रियदर्शन देशपांडे याचे सेमीनरी हिल्सजवळील पेसो कार्यालयाजवळ छोटेसे झेरॉक्सचे दुकान आहे. मात्र, देशपांडेला झटपट कोट्यधीश व्हायचे होते. त्यामुळे त्याने पेसो कार्यालयात येणाऱ्या अधिकाऱ्यांना हाताशी धरुन देशभरात लाचखोरीचे जाळे पसरवले. त्याने खामल्यात नुकताच सात कोटींचा बंगला बनवला आहे. तसेच कोट्यवधी रुपयांचे भूखंड घेतल्याची माहिती समोर आली आहे.

एक अधिकारी अजुनही ‘वॉंटेड’ !

पेसो कार्यालयातील आणखी अधिकारी सीबीआय कारवाईच्या कक्षेत आहे. त्या अधिकाऱ्याची भूमिका संशयास्पद असून त्याच्याकडे कोट्यवधी रुपयांचे घबाड असल्याची माहिती आहे. तो अधिकारी वारंवार विदेशी वाऱ्या करीत असल्यामुळे आणि अनेक राज्यात बंगले असल्यामुळे सीबीआयच्या रडारवर आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur corrupt agent priyadarshan deshpande linked with western coalfields limited cbi enquiry adk 83 css