नागपूर : गैरसमजातून पतीची मारहाण आणि संसारात सासूसासऱ्यांच्या अतिहस्तक्षे याला कंटाळून पाच महिन्यांची गर्भवती विवाहिता माहेरी आली. पत्नीने गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतरही पतीने स्वाभिमान दुखावल्याचा राग मनात ठेवत तिला परत आणले नाही. परंतु, १५ वर्षांनंतर मुलगी शैक्षणिक कागदपत्रासाठी वडिलांच्या घरी गेली अन् पित्याचे हृदय पाझरले. भरोसा सेलने पती-पत्नीचे समूपदेशन करुन त्यांचा संसार पुन्हा रुळावर आणला.
संजय आणि नेहा (बदललेले नाव) हे दोघेही उच्चशिक्षित. संजय हा कृषी विभागात शासकीय नोकरीवर असून त्याचे २००९ मध्ये त्याचे नेहाशी लग्न झाले. नवीन सून घरी आल्यानंतर संजयच्या आईवडिलांनी तिला त्रास देणे सुरु केले. सासूच्या सांगण्यावरुन नोकरीवरुन घरी आलेला संजय तिला मारहाण करायला लागला. नेहाला प्रत्येक गोष्टीत सासूचे मत घ्यायला लागायचे. सासूसुद्धा विनाकारण तिला त्रस्त करीत होती. घरात लवकरच पाळणा हलणार आणि घरातील चित्र बदलेल असे नेहाला वाटत होते. मात्र, पतीची मारहाण आणि सासरच्या छळ सुरुच होता. पाच महिन्यांची गर्भवती असलेली नेहा माहेरी निघून आली. नेहाने गोंडस मुलीला जन्म दिला. बाळाबाबत पती व सासरच्यांना माहिती देण्यात आली. मात्र, कुणीही भेटायला आले नाही. काही वेळ गेल्यावर सर्व काही सुरळीत होईल, अशी आशा तिला होती. मात्र, तिचे आणि सासरचे नाते कायमचे तुटले. मुलगी मोठी झाली नेहा आईला आर्थिक भार सहन होत नसल्याने खासगी काम करायला लागली. मुलीच्या शिक्षणाचा खर्च झेपावत नसल्यामुळे तिने न्यायालयात खटला भरला. मुलीचा खर्च मिळायला लागला. नेहा ही मुलीला घेऊन कशीबशी जीवन जगत होती.
हेही वाचा : आरक्षणावरील राहुल गांधी यांचे वक्तव्य, पटोले म्हणतात ” भाजप खोटा..”
मुलीला बघताच बापाचे काळीज पाझरले
संजय आणि नेहाची मुलगी १५ वर्षांची झाली होती. तिला पुढील शिक्षणासाठी वडिलांच्या कागदपत्रांची आवश्यकता होती. नेहाने पतीच्या घरापर्यंत जाण्यास असमर्थता दर्शविली. मुलीने एकटीच वडिलांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. ती वडिलांच्या घरी गेली आणि दारात उभी झाली. एवढ्या दिवसांनंतर मुलीला बघून वडिलांचे काळीज पाझरले. त्याने तिला घट्ट मिठी मारली. आजी-आजोबांनी नातीला जवळ घेतले. तिला खाऊ-पिऊ घातले. ती सायंकाळी आईकडे निघून गेली.
हेही वाचा : लोकजागर- दादा, माघारी फिरा!
पोलिसांचेही डोळे पाणावले
मुलीने घरी आल्यानंतर बाबांसोबत राहायचे, असा हट्ट धरला. तिने वडिलांनाही फोन करुन सोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. पती-पत्नी घरगुती वाद सोडविण्यासाठी भरोसा सेलमध्ये पोहचले. पोलीस निरीक्षक सीमा सूर्वे यांनी दोघांचीही बाजू ऐकून घेतली. जयमाला बारंगे यांनी पती-पत्नीचे समूपदेशन केले. गेल्या १५ वर्षांनंतर पहिल्यांदा समोरासमोर भेटणाऱ्या पती-पत्नीने एकमेकांसमोर मन मोकळे केले. मुलीने दोघांनाही घट्ट मिठी मारली. दोघांनीही हंबरडा फोडला. पहिल्यांदाच एकत्र झालेल्या दाम्पत्याची भावनिक स्थिती बघता उपस्थित पोलिसांच्याही डोळ्याच्या कळा पानावल्या. भरोसा सेलमधून पती-पत्नी मुलीसह एकाच कारमधून घराकडे निघाले.