नागपूर : आंतरराष्ट्रीय बुकी सोंटू जैनच्या आठ कोटी रुपयांची उलाढाल करून पैशाची बॅग घरात लपवून ठेवणाऱ्या मित्राला गुन्हे शाखेने अटक केली. दिनेश ऊर्फ बंटी कोठारी (रा. गोंदिया) असे आरोपी मित्राचे नाव असून त्याला आठ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
बंटी कोठारी हा बुकी सोंटू जैनचा मित्र आहे. सोंटू जैनवर गुन्हा दाखल झाल्यानंतर संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरु असताना बंटी कोठारी याने सोंटूची पत्नी गरीमा जैन, भाऊ धीरज ऊर्फ मोंटू जैन, आई कुसुमदेवी जैन यांच्या मदतीने घरातील ८ कोटी रुपये रोख आणि काही सोने असलेली बॅग बंटीने घेतली आणि स्वतःच्या घरात लपवून ठेवली. त्यासाठी सोंटूने बंटीला एक कोटी रुपये देण्याचे ठरविले होते. त्यामुळेच सोंटूच्या गुन्ह्यात बंटीने त्याला मदत केली. पोलिसांनी त्याला आज अटक करून न्यायालयात उपस्थित केले. न्यायालयाने बंटीला आठ दिवस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
हेही वाचा : “शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत मात्र सरकार विरोधी पक्ष फोडण्यात व्यस्त”, अनिल देशमुख यांची टीका, म्हणाले…
बँक व्यवस्थापकाला ४ कोटींची लाच
एक्सीस बँकेचा व्यवस्थापक अंकेश खंडेलवाल याची भेट सोंटूचा भाऊ मोंटू जैनने घेतली. त्याला डॉ. गरीमा बग्गा आणि डॉ. गौरव बग्गा यांची खाते उघडून त्यांच्या लॉकरमध्ये ८ ते १० कोटी रुपये आणि काही सोने ठेवण्याचा कट रचला. बँक व्यवस्थापक खंडेलवाल याने ४ कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केली. शेकडो कोटींचे मालक असलेल्या जैन कुटुंबाने डॉक्टर दाम्पत्य बग्गा यांच्या लॉकरमध्ये रक्कम ठेवण्याच्या मोबदल्यात खंडेलवालला ४ कोटींची लाच दिल्याची माहिती तपासात समोर आली.