नागपूर : उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह जिल्हा असलेल्या नागपुरात महावितरणकडून रोज सुमारे १९० नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहे. वर्षभराची आकडेवारी काढल्यास ही संख्या ६९ हजार ५२२ जोडण्या एवढी आहे. जिल्ह्यात सर्वाधिक घरगुती ग्राहकांना जोडण्या देण्यात आल्या आहे. नागपूर आणि वर्धा शहरांसह महावितरणच्या नागपूर परिमंडळात गेल्या वर्षभरात (२०२३) सर्व वर्गवारीत ८४ हजार २३७ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. यापैकी तब्बल ६२ हजार ८६३ घरगुती आणि ७ हजार २०३ कृषी जोडण्यांचा समावेश आहे. महावितरणच्या नागपूर परिमंडळात दरवर्षी साठ ते सत्तर हजार नवीन वीज जोडण्या दिल्या जातात. परंतु यंदा तब्बल ८४ हजार २३७ जोडण्या देण्याचा विक्रम केला गेला.
हेही वाचा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघावर प्रफुल्ल पटेल दावा ठोकणार? म्हणाले, “आम्ही लढण्याचा निर्णय घेतला तर…”
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून नव्या जोडण्यांसाठी आवश्यक वीजमीटरचा तत्काळ पुरवठ्यासाठी ‘महावितरण’चे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी आणि मुख्य अभियंता दिलीप दोडके नियमित आढावा घेतात. त्यामुळे नवीन वीजजोडणी देण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढल्याचा महावितरणचा दावा आहे. नागपूर परिमंडळात यापूर्वी महिन्याला ५ ते ६ हजार नवीन वीजजोडण्या देण्यात येत होत्या. हा वेग गेल्या वर्षी महिन्याला ७ हजारांवर गेला आहे. हा वेग आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी दिली.
नागपुरातील मंडळ व वर्गवारीनुसार नवीन वीज जोडणी
(१ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३)
वर्गवारी | नागपूर ग्रामीण | नागपूर शहर | वर्धा मंडळ | नागपूर परिमंडळ |
घरगुती | १६,९७८ | ३७,१३५ | ८,७५० | ६२,८६३ |
वाणिज्यिक | १,९४४ | ६,८१० | १,९०२ | १०,६५६ |
औद्योगिक | ४२८ | ६४८ | २१९ | १,२९५ |
कृषी | ३,५५१ | २३२ | ३,४२० | ७,२०३ |
इतर | ७०९ | १,०८७ | ४२४ | २,२२० |
एकूण | २३,६१० | ४५,९१२ | १४,७१५ | ८४,२३७ |