नागपूर: महायुती सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य शासनाने शनिवारी घेतलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. हा ओबीसींवर अन्याय आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. त्यावर फडणवीस यांनी नागपूरमध्ये प्रतिक्रिया दिली. खासदार औद्योगिक महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाच्यानिमित्ताने सोमवारी फडणवीस यांचे दुपारनंतर नागपूरमध्ये आगमन झाले.
हेही वाचा : ‘कॅटरिना’ चक्क पाचव्यांदा आई!
त्यावेळी त्यांना मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाबद्दल व त्यावर उमटणाऱ्या प्रतिक्रियांबद्दल पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, “मी स्वत: भुजबळ यांची भेट घेणार आहे. त्यांनी आक्षेप सांगावे, ओबीसींवर अन्याय होत आहे असे दिसून येत असेल तर निर्णयात सुधारणा केली जाईल. प्राथमिकदृष्टया सरकारने घेतलेला निर्णय संतुलित आहे. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांनाच प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील हा निर्णय आहे. मराठा आरक्षणासाठी शासनाने प्रक्रिया सुरू केली आहे त्यामुळे यावर अधिक प्रतिक्रिया देणे योग्य होणार नाही. राज्य सरकारची भूमिका ओबीसींवर अन्याय करण्याची नाही, खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा हीच बाब वेळोवेळी सांगितली आहे. जोपर्यंत सरकारमध्ये भाजप आहे तोपर्यंत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही.”