नागपूर : एकीकडे मराठा आरक्षणाबाबत जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत जवळ येत आहे. दुसरीकडे जरांगे या प्रश्नावर अधिक आक्रमक होत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करीत आहे. याचे पडसाद नागपूरमध्ये सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी रविवारी रात्री जरांगेबाबत सूचक प्रतिक्रिया दिली.
रोजगार मेळाव्याच्या समारोपानंतर प्रसार माध्यमाशी ते बोलत होते. नागपूरचा नमो महारोजगार मेळावा यशस्वी झाला असून मेळाव्यासाठी ६५ हजार तरुणांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३२ हजारांवर तरुण प्रत्यक्ष उपस्थित होते. यापैकी ११ हजारांवर तरुणांना नोकरीचे ‘ऑफर लेटर’ देण्यात आले. यात दहा लाखांपेक्षा अधिकचे पॅकेज असणारे पाच तर अनेकांना सहा लाखाचे पॅकेज मिळाले आहे, असे फडणवीस म्हणाले.
हेही वाचा : सायबर गुन्हेगारांचा धुमाकूळ, देशात महाराष्ट्राचा चौथा क्रमांक
मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवर मनोज जरांगे यांच्याकडून होत असलेल्या आरोपांकडे फडणवीस यांचे लक्ष वेधले असता ‘मी योग्यवेळी याचा खुलासा करेल’ अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सोमवारपासून सुरू होत आहे. यात मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांची प्रतिक्रिया महत्त्वाची ठरते. जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य शासनाला २४ डिसेंबरची मुदत दिली आहे. ही तारीख जसजशी जवळ येत आहे तसे जरांगे अधिक आक्रमक होत आहेत. त्यांनी फडणवीस यांच्यावरही टीका करणे सुरू केले आहे, हे येथे उल्लेखनीय.