नागपूर : नागपूरला विधिमंडळाचे अधिवेशन असले की विदर्भाच्या अनुशेषाची चर्चा होते. पण, आता आर्थिक अनुशेष संपला, भौतिक अनुशेष थोडा शिल्लक आहे, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. विधान परिषदेत विदर्भाच्या प्रश्नावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केले.
केंद्र सरकारकडे सिंचनाच्या अनुशेषाचा प्रश्न मांडला, तेव्हा बळीराजा जलसंजीवनीच्या माध्यमातून केंद्राने मोठी मदत केली. या योजनेतील ८० टक्के प्रकल्प हे विदर्भातील आहेत. विदर्भासाठी महत्त्वाचे वैनगंगा – नळगंगा हा ८८ हजार कोटींचा प्रकल्प क्रांती करणारा प्रकल्प ठरणार आहे. पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत त्याला मान्यता घेण्यात येईल. राज्यात नवीन सरकार आल्यापासून विदर्भात २६ विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांसाठी ५०, ५९५ कोटी रुपयांचे देकार पत्र दिले. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा १२ तास देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.