नागपूर : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मोठ्या प्रमाणात ग्राहक सोने- चांदीचे दागिने खरेदी करतात. यंदा चार दिवसांपूर्वी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ग्राहकांनी मागील वर्षीहून २० टक्के अधिक दागिने खरेदी केल्याचा सराफा व्यावसायिकांचा अंदाज आहे. परंतु आता सोन्याच्या दरात चांगली घसरण होतांना दिसत आहे. त्यामुळे लग्न असलेल्या कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूरसह सर्वत्र मध्यंतरी सोने- चांदीचे दर विक्रमी उंचीवर पोहोचले होते. सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७४ हजारापर्यंत गेले होते. त्यानंतर हे दर प्रति दहा ग्राम २४ कॅरेटसाठी ७२ हजारांहून खाली आले. परंतु अक्षय्य तृतीयेच्या दिवशी बाजार उघडताच सोन्याच्या दराने उसळी घेत संध्याकाळपर्यंत २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७३ हजार ३०० रुपयांपर्यंत मजल मारली होती. या दिवशी सकाळी हे दर सुमारे ५०० रुपयांनी कमी होते.

हेही वाचा : गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात महिला ठार; तेंदूपाने तोडण्यासाठी जंगलात जाणे जीवावर बेतले

अक्षय तृतीयेलाच (१० मे २०२४ ) २२ कॅरेटसाठी सोन्याचे दर ६८ हजार २००, १८ कॅरेटसाठी ५७ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार ६०० रुपयांपर्यंत पोहोचले. चांदीचा दर प्रती किलो ८५ हजार ३०० रुपये होता. त्यामुळे ग्राहकांना महागड्या दरात सोने खरेदी करावे लागले. दरम्यान चार दिवसांनी १४ मे २०२४ रोजी नागपुरातील सराफा बाजारात सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम तब्बल ८०० रुपयांनी घसरले आहे. त्यामुळे नागपुरात २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्रामसाठी ७२ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६७ हजार ४००, १८ कॅरेटसाठी ५६ हजार ६०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार १०० रुपये होते. चांदीचा दर प्रती किलो ८४ हजार ९०० रुपये होता. दरम्यान या विषयावर नागपुरातील सराफा व्यवसायिकांकडून तुर्तास सोन्याचे दर कमी झाले असले तरी ग्राहकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचा दावा होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती बघता पुढे सोन्याचे दर आणखी वाढण्याचा अंदाजही सराफा व्यवसायिकांकडून वर्तवला जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur decline in gold price after akshay tritiya 2024 gold price today mnb 82 css