नागपूर : राज्यातील वकिलांना अद्यावत प्रशिक्षण देण्याकरिता महाराष्ट्रात ‘ॲडव्होकेट अकॅडमी’ची स्थापना करण्यात येत आहे. देशातील अशाप्रकारची पहिलीची संस्था होणार असल्याचा दावा केला जात आहे. महाराष्ट्र शासनाने ‘ॲडव्होकेट अकॅडमी’च्या निर्मितीसाठी दोन ठिकाणी भूखंड देण्यास मंजुरी प्रदान केली आहे. लवकरच या ठिकाणी भूमिपूजन सोहळा होईल आणि अकॅडमीचे कार्य सुरू करण्यात येईल. मात्र भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या आधीच अकॅडमीला काय नावे द्यावे यावरून चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार काउंसिलची २३ सप्टेंबर रोजी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे.

सभेच्या पूर्वसंध्येला बार काउंसिलचे माजी अध्यक्ष ॲड.परिजात पांडे यांनी पत्रक काढून प्रस्तावित ‘ॲडव्होकेट अकॅडमी’ला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याबाबत निर्णय घेण्याची विनंती केली आहे. पत्रकातील तपशिलानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बार काउंसिलला ऑगस्ट २०१९ मध्ये अकॅडमीसाठी जागा देण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळाने बार काउंसिलला ठाणे जिल्ह्यातील कळवामध्ये तसेच पनवेलमधील तळोजा येथे भूखंड देण्याचा निर्णय घेतला. यानंतर तळोजा येथे ‘ॲडव्होकेट अकॅडमी’च्या निर्मितीबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला. लवकरच तळोजा येथे भूमिपूजनाचा कार्यक्रम होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर ॲड.परिजात पांडे यांनी अकॅडमीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी करणारे पत्र बार काउंसिलच्या नावाने प्रकाशित केले आहे. बार काउंसिलच्या २३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत याबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा… नागपूर : वाघाच्या जेरबंदीवरून वनखाते अडचणीत? नियमांचे उल्लंघन…

वकिलांना काय फायदा?

नवोदित वकिलांना विधी क्षेत्रातील विविध बाबींचे प्रशिक्षण मिळणार कायदा क्षेत्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी केंद्र उपलब्ध होणारविधी क्षेत्रातील अद्यावत माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार.

हे ही वाचा…गोंदिया : हातात फलक, डोळ्यात राग; बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ जनआक्रोश…

न्यायप्रिय राजाचे नाव संयुक्तिक ठरेल

छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या न्यायप्रियतेसाठी ओळखतो. सर्वसामान्य जनतेला जलद व सुलभ न्याय देण्यासाठी शिवाजी महाराज सदैव कटिबद्ध होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी कायद्याचे राज्य प्रस्थापित केल्याच्या घटनेला म्हणजेच राज्याभिषेक सोहळ्याला अलिकडेच साडेतीनशे वर्ष पूर्ण झाले आहे. न्याय क्षेत्राचे पावित्र्य कायम राहण्याच्या दृष्टीने वकिलांना प्रशिक्षित करण्याचे कार्य ‘ॲडव्होकेट अकॅडमी’च्या मार्फत होणार आहे. त्यामुळे अकॅडमीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देणे संयुक्तिक ठरेल. बार काउंसिलच्या सर्वसाधारण सभेत याबाबत निर्णय घेण्यात यावा. – ॲड.परिजात पांडे, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र व गोवा बार काउंसिल