नागपूर : लोकसेवा प्रतिष्ठान आणि आमदार मोहन मते मित्र परिवाराच्यावतीने मंगळवार पासून पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेला प्रारंभ झाला. मात्र त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी दोन दिवस म्हणजे रविवारपासून हजारो लोक नागपुरात स्थायिक झाले असून त्यांनी कार्यक्रम स्थळी सभामंडपात ठाण मांडले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवचनाला भेट दिली. उमरेड मार्गावरील दिघोरी चौक येथील बहादुरा फाटा टोल नाक्याजवळ असलेल्या ८० एकर परिसरात या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले असून दोन ते अडीच लाख लोक बसतील असा सभामंडप तयार करण्यात आला आहे. ५ हजार स्वयंसेवक या व्यवस्थेत आहे. नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या प्रवचनाची गेल्या महिन्याभरापासून तयारी सुरु असताना प्रवचन ऐकण्यासाठी जागा मिळेल की नाही म्हणून बाहेरगावी राहणाऱ्या हजारो भाविकांनी दोन दिवस आधी सभामंडपात येऊन ठाण मांडले आहे.
भाजपाचे दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या प्रदीप मिश्रा यांच्या प्रवचनाला पहिल्याच दिवशी मंगळवारी दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी फडणवीस यांनी प्रदीप मिश्रा यांचे स्वागत केले. तर फडणवीस यांचे स्वागत मिश्रा यांनी केले. पहिल्याच दिवशी १ लाखापेक्षा अधिक भाविक पोहोचले असून दिघोरी पासून उमरेडकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या प्रवचनाला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह कर्नाटक, छत्तीसगढ, मध्यप्रदेश या राज्यांतील भाविक या ठिकाणी आले आहेत. आतमध्ये जागा नसल्यामुळे अनेक लोकांना बाहेर उभे राहून प्रवचन ऐकावे लागले. २१ ऑक्टोबरपर्यंत ही कथा चालणार आहे.
हेही वाचा : भंडारा : संतप्त प्रवाशांचा बस स्थानकासमोर राडा, तब्बल तासभर बसेस स्थानकावर अडविल्या
पंडित प्रदीप मिश्रा यांना मध्यप्रदेशमध्ये प्रसिद्ध कथा वाचक म्हणून ओळखले जात असून ते सिहोर जिल्ह्यातील कुदेश्वर धाम येथील आहेत. मागील वर्षभरात पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांची ख्याती जगभर पसरली असून त्यांना मानणारा मोठा वर्ग निर्माण झाला आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे रुद्राक्ष मानवी जीवन बदलते आणि पवित्र स्थान असलेल्या सिहोरचे रुद्राक्ष फायदेशीर असल्याचे महाराज सांगत असलेले उपाय आणि प्रवचन होय. धर्मजागृती आणि संघटनाचे महान कार्य पंडित मिश्रा करत असल्याचे तेथील लोक म्हणतात.