नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नागरिकांनी पांढरा बंगाली कुर्ता, सफारी किंवा कोट, या वेषभूषेत नेहमीच बघितले असेल. परंतु आज नागपुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ‘न्यू लूक’ पहायला मिळाला. अजित पवारांनी शनिवारी सिताबर्डी ते खापरी असा मेट्रो प्रवास केला. याप्रसंगी त्यांनी शर्ट-पँट आणि गाॅगल घातला होता. यावेळी त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर, संचालक अनिल कोकाटे व राजीव त्यागी तसेच सारंग गडकरी यावेळी उपस्थित होते. मेट्रो रेल्वेकडून असलेल्या अपेक्षा व सूचना पवार यांनी यावेळी खूद्द नागपुरातील प्रवाशांकडून जाणून घेतल्या. मेट्रो रेल्वेमुळे वेळेची व पैशाची बचत होत असल्याचे सुमित मोरे या परभणी येथून नागपूरात नोकरीनिमित्त स्थायीक झालेल्या प्रवाशाने सांगितले. इतर प्रवाशांनीही मेट्रोबाबत समाधानी असल्याचे सांगितल्यावर उपमुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला.

हेही वाचा : “धारावीसाठी उद्धव ठाकरे यांचा मोर्चा हा फुसका बार आहे”, बावनकुळे यांची टीका

केंद्र व राज्य शासनाकडून मेट्रो रेल्वे प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते, त्यानुसार प्रवाशांना आवश्यक सोयीसुविधा पुरविण्याचे तसेच स्वच्छतेची सवय लावण्याच्या सूचना पवार यांनी मेट्रोरेल्वे प्रशासनाला केल्या. तत्पूर्वी, त्यांनी सिताबर्डी इंटरचेंज स्थानकाची पाहणी केली तसेच येथील दुकानदारांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रवासादरम्यान रेल्वेतून दिसत असलेल्या शहरातील विविध स्थळांची माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी हर्डिकर यांच्याकडून जाणून घेतली. नागपुरातील हिरवळीचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले. या प्रवासादरम्यान आणि प्रवासानंतर अजित पवारांच्या न्यू लूकबाबत खमंग चर्चा सुरू आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur deputy cm ajit pawar in new look travelled in metro mnb 82 css
Show comments