नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) संयुक्त गट-ब व गट-क-२०२४ च्या जाहिरातीची स्पर्धा परीक्षार्थी चातकाप्रमाणे वाट बघत असताना वर्ष उलटूनही अद्याप पदभरतीची चिन्हे दिसत नसल्याने उमेदवारांची चिंता वाढली आहे. मराठा आरक्षणामुळे जाहिरातीत बदल करायचा असून शासनाकडून सुधारित मागणीपत्र ‘एमपीएससी’ला अद्यापही प्राप्त न झाल्याने संयुक्त परीक्षेची जाहिरात रखडल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे मोठ्या संख्येने पदे असलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाचेही मागणीपत्र अद्याप प्राप्त झालेले नाही. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परीक्षेच्या संदर्भात फार महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यामुळे आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी परीक्षेची जाहिरात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या तारखेला येणार परीक्षेची जाहिरात
शासन सेवेतील गट ब आणि क पदांसाठीची जाहिरात पुढच्या आठवड्यातच काढण्यात येणार आहे. याबाबतची माहिती खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. फडणवीसांनी दिलेल्या या माहितीमुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गट ब आणि क पदांची जाहिरात काढण्यासाठी आपण एमपीएससी अध्यक्षांना मी फोन करून विनंती केल्याची माहितीही फडणवीस यांनी ट्विट करत दिली आहे. आपल्या एक्स अकाऊंटवर त्यांनी लिहिले की, शासन सेवेतील गट ब आणि क पदांसाठीची जाहिरात तत्काळ प्रकाशित करण्यात यावी, यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी माझ्याकडे मागणी केली होती. आज अध्यक्षांना मी फोन करून यासंदर्भात विनंती केली. त्यांनी येत्या आठवड्यातच ही जाहिरात काढण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. यामुळे इच्छूक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा : Video: मोदींचा दौरा; बंदोबस्तातील पोलिसांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल, चित्रफित व्हायरल
रोहित पवारांचे फडणवीसांना उत्तर
दुसरीकडे फडणवीसांच्या याच ट्विटवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवारांनी ट्विटमध्ये लिहिले की, संयुक्त परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी आयोगाची कुठलीच हरकत नाही, केवळ आपल्या गृहविभागाकडून पीएसआय पदाचे मागणीपत्रक आयोगाकडे गेले नसल्याने जाहिरात प्रसिद्ध होऊ शकलेली नाही. त्यामुळे आपल्या विभागाने तात्काळ रिक्त पदांचे मागणी पत्रक आयोगाला पाठवून सहकार्य केल्यास जाहिरात त्वरित प्रसिद्ध होऊ शकते. राज्यात पीएसआयच्या जवळपास २५०० जागा रिक्त आहेत. त्यामुळे ज्याप्रमाणे २०१२ मध्ये तत्कालीन गृहमंत्री स्व.आर आर आबांनी १८५२ जागांची भरती केली होती. त्याचप्रमाणे यंदा आपण देखील मोठी जाहिरात प्रसिद्ध करावी तसेच राज्यसेवा जागावढीचा प्रश्न देखील मार्गी लावावा ही विनंती. असो, उशिरा का होईना आपण विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेतली याबद्दल आपले आभार.