नागपूर : उपराजधानीतील ‘लॉजिस्टिक हब’वर लक्ष केंद्रीत करणार, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपुरातील देवगिरी येथे दिवाळी स्नेहमिलननिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी फडणवीस म्हणाले, नागपुरातील विविध प्रकल्पांकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मी स्वत: लक्ष घालत आहोत. बहुतांश प्रकल्पांना गती मिळाली असून तीन- ते चार वर्षांत त्याचा परिणाम दिसेल. सध्या नागपुरला लाॅजिस्टिक हब बनवण्याच्या प्रकल्पावर लक्ष केंद्रीत केले आहे.
नागपूर रिंगरोडवर मेट्रोऐवजी मेट्रोला जोडणाऱ्या इलेक्ट्रिक बस, ट्राॅली बसेससाठीचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी टाटा कंपनीला अभ्यास करण्याची विनंती केली आहे. नागपुरात इंटिग्रेटेड ट्राॅफिक सिस्टिमसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार सॅटेलाईटद्वारे शहरातील वाहतुकीचा अभ्यास करून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न होईल. अपारंपारिक ऊर्जेबाबतच्या गुंतवणुकीत काही तांत्रिक अडचणी होत्या. त्या दूर झाल्या असून या क्षेत्रात आता मोठी गुंतवणूक शक्य असल्याचेही फडणवीस म्हणाले. उत्तर नागपुरात डॉ. आंबेडकर रुग्णालय सरकारी निधीतूनच होईल. वर्धा रोडवर पीपीपी माॅडेलवर रुग्णालय होणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. राम मंदीर आंदोलनाशी जुडलो असल्याने २२ जानेवारीच्या कार्यक्रमाला अयोध्येत जाण्याची इच्छा आहे. परंतु तेथील सोय- सुविधा व नियोजनानुसार २२ अथवा २३ जानेवारी किंवा एक आठवड्यानंतर बोलावणे आल्यास तेव्हा जाणार असल्याचेही फडणवीस म्हणाले.
नवीन एमआरडीसीसाठी प्रयत्न
मिहान, बुटीबोरीसह इतरही औद्योगिक वसाहतींमध्ये सध्या जागा शिल्लक नाही. त्यामुळे लवकरच शहरात नवीन एमआयडीसीसाठी प्रयत्न केले जातील. समृद्धी महामार्गावरील गॅस पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे लवकरच येथील उद्योगांना आवश्यकतेनुसार गॅस उपलब्ध होणार असल्याचेही फडणवीस म्हणाले.
हेही वाचा : अकोल्यातील पाच सायकलस्वारांची पर्यावरण संवर्धन यात्रा
पेट्रोकेमिकल काॅम्प्लेक्सचा अहवाल सकारात्मक
पेट्रोकेमिकल काॅम्प्लेक्सबाबतचा पहिला अहवाल संबंधित विभागाकडे सादर झाला आहे. दुसराही अहवाल सादर होण्याची शक्यता आहे. हा अहवाल सकारात्मक असल्याची माहिती असून त्यावरही लवकरच निर्णय होणार असल्याचेही फडणवीस म्हणाले.