नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्म आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बालपनी अत्यवस्थ झाले असतांना नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचारासाठी दाखल झाले. दोघांनी खुद्द राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापुढे हा किस्सा सांगितला. मध्य भारतातील सर्वात मोठे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणून नागपुरातील मेडिकलची ख्याती आहे. नागपुरातील मेडिकल रुग्णालयाला नुकतेच ७५ वर्षे पूर्ण झाले आहे. त्यामुळे संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षाचा शुभारंभ नुकताच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी मंचावर राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये हेही उपस्थित होते.
हेही वाचा : महाराष्ट्रात काँग्रेसची लाट – नाना पटोले
राष्ट्रपतींच्या उद्बोधनापूर्वी प्रथम देवेंद्र फडणवीस यांनी आपले मत मेडिकलच्या आजी- माजी विद्यार्थ्यांपूढे मांडले. फडणवीस म्हणाले, माझा जन्म मेडिकल महाविद्यालयातच झाला असून ही संस्था माझी आई आहे. येथे उत्कृष्ट डॉक्टर रुग्णसेवा देत असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही ही संस्था फडणवीस यांची आई असली तरी मी लहान असतांना मलाही येथेच दाखल केले गेले होते. माझी प्रकृती खूपच खालवली होती. त्यामुळे येथील तज्ज्ञ डॉक्टरांनीच माझा जीव वाचवल्याचे मत व्यक्त केले. दोघांनीही मेडिकल या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची मनापासून कौतुक केले. आजपर्यंत या रुग्णालयात कोट्यावधी रुग्णांचे जीव वाचवण्यात आल्याचे सांगत ही संस्था आणखी विकसीत होण्याची गरज विषद केली. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मेडिकलचा पुढील ५० वर्षांच्या दृष्टीने विकास केला जाणार असल्याचे सांगत साडेपाचशे कोटींचा निधी या संस्थेला दिल्याचे सांगितले. राष्ट्रपतींपुढे या दोन दिग्गच नेत्यांनी मेडिकलला उपचार घेतल्याचे व येथे उत्कृष्ठ डॉक्टर असल्याचे सांगितल्याने सर्वसामान्यांचा मेडिकलवरील विश्वास आणखी दृढ होण्यास मदत होणार असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.
हेही वाचा : ‘या’ चार जिल्ह्यांत आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राचा थरार, उल्का वर्षाची पर्वणी; जाणून घ्या कुठे, केव्हा…
मेडिकल विषयी..
मेडिकलमध्ये आंतरुग्णांवर उपचारासाठी १,४०१ रुग्णशय्या मंजूर असल्या तरी प्रत्यक्षात १,८०० च्या जवळपास रुग्णशय्या उपलब्ध आहेत. त्यापैकी सुमारे १ हजार ते बाराशे रुग्णशय्येवर रुग्ण दाखल होऊन उपचार घेत असतात. मेडिकलच्या अखत्यारित सुपरस्पेशालीटी रुग्णालय, ट्रामा केअर सेंटर, व्यवसायोपचार व भौतिकोपचार महाविद्यालय, बीएससी नर्सिंग महाविद्यालय, बीपीएमटीसह इतरही काही अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. मेडिकल ही संस्था सुमारे २३२ एकर परिसरात पसरलेली आहे.