नागपूर : जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात महाशिवरात्रीनिमित्त उपवासाचे भगर, शिंगाडा पिठामुळे तब्बल सव्वाशे नागरिकांना विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती आहे. या सगळ्यांवर नागपुरातील मेडिकल, मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह इतरही शासकीय व खासगी रुग्णालयांत उपचार करण्यात आले. त्यापैकी काही रुग्ण अद्यापही रुग्णालयात आहेत.

महाशिवरात्रीचा उपवास सोडल्यानंतर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास मेडिकलमध्ये एकाच कुटुंबातील पाच जण उलटी, हगवण आणि पोटदुखीमुळे दाखल झाले. हिंगणा, कामठीसह इतर भागातील सरकारी व खासगी रुग्णालयात एकूण १२ तासात १२५ वर रुग्ण उपचाराला आले.

हेही वाचा…महायुतीतील ८० टक्के जागांचा तिढा सुटला! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

उपवासाचे पदार्थ खाऊन विषबाधा झाल्याचे पढे येताच अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. यावेळी कोणी घरीच साहित्य आणून पदार्थ तयार केले तर काहींनी विकत आणल्याची माहिती दिली. या सगळ्यांनी सिंगाड्याचे पीठ, सेव, भगर असे उपवासाचे पदार्थ सेवन केले होते. मोहननगर आणि खलाशी लाईनसह इतरही वस्त्यांमधील सुमारे ३५ जणांना मेयोत दाखल करण्यात आले. अन्न व औषध प्रशासन विभागाने विविध पथके पाठवून ६ नमुने गोळा तपासणीला पाठवले. रात्री उशिरापर्यंत हे साहित्य जप्त करण्याची कारवाई सुरू होती.

सर्वाधिक रुग्ण कामठी भागातील

विषबाधा झालेले सर्वाधिक नागरिक कामठी परिसरातील होते. मोहन नगर, खलाशी लाईन, फुटाळा तलावाभोवतालच्या वसाहती, त्रिमूर्ती नगर, खामला, बिनाकी मंगळवारी, विनोबा भावे नगर, तांडापेठ आदी भागांसह हिंगणा, कामठीमधील सुमारे सव्वाशेवर नागरिकांना विषबाधा झाल्याचे सूत्रांची माहिती आहे. एकूण रुग्णांपैकी सुमारे ३५ रुग्ण मेयो, ५ रुग्ण मेडिकल, ३६ रुग्ण विविध खासगी रुग्णालयात, ५० रुग्ण कामठीतील विविध रुग्णालयात गेल्याची माहिती आहे.

हेही वाचा…पुन्हा एकदा…आमदार संजय गायकवाड! आता यामुळे सोशल मीडियावर धूम…

शिंगाडा पीठ मुदतबाह्य

मेयो रुग्णालयातील विषबाधा झालेल्या बऱ्याच रुग्णांनी डॉक्टरांना घरून आणलेले शिंगाड्याच्या पिठाचे पाकिट दाखवले. त्यात पिठाची मुदत १५ फेब्रुवारीलाच संपल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. त्यामुळे एफडीए या प्रकरणात काय करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा…सुजात आंबेडकर यांच्‍या उमेदवारीसाठी अमरावतीत ठराव

“उपवासाच्या पदार्थातून विषबाधेची तक्रार मिळताच एफडीएचे पथक वेगवेगळ्या भागात जाऊन तपासणी करत आहे. सहा नमुने गोळा केले असून रात्री उशिरापर्यंत जप्तीची कारवाई सुरू होती. प्राथमिक माहितीनुसार ५० ते ६० जणांना विषबाधा झाल्याची माहिती आहे. कुणाचीही प्रकृती गंभीर नाही. ” – किशोर जयपूरकर, सहआयुक्त, अन्न व औषध विभाग (अन्न), नागपूर.

Story img Loader