नागपूर : नागपूर जिल्ह्यात जवळपास ५० पेक्षा जास्त बारुद, स्फोटक सामग्री आणि अन्य सामग्री निर्माण करणाऱ्या कंपन्या आहेत. गेल्या दोन वर्षांत नागपूर जिल्ह्यात असलेल्या ५ कंपन्यांतील स्फोटात तब्बल ३१ कामगारांचा मृत्यू झाला तर तर २६ कामगार गंभीर जखमी झाले. एवढ्या मोठ्या जिवीतहाणीनंतरही प्रशासनाला जाग आली नाही. अजुनही अनेक कंपन्यांमध्ये सुरक्षिततेची साधने कामगारांना देण्यात येत नाही. एखादी अनुचित घटना झाल्यावरच प्रशासनाला जाग येते, असा आरोप होत आहे.

गेल्या दोन वर्षात हिंगणा,एमआयडीसी, धामना, कोतवालबड्डी आणि उमरेड येथील स्फोटक सामग्री करणाऱ्या कंपन्यांमध्ये स्फोट झाले आहेत.

वर्ष २०२५ मध्ये कोतवालबड्डी आणि उमरेडमधील कंपन्यांमध्ये स्फोटाच्या घटना घडल्या. फेब्रुवारी २०२५ मध्ये कोतवालबड्डीतील एशियन फायर वर्क्स कंपनीत स्फोट झाला आणि दोन कामगार जागीच ठार झाले तर तीन कामगार गंभीर जखमी झाले होते. तर एप्रिलमध्ये उमरेडमधील एमएमपी कंपनीतील स्फोटात ५ कामगार ठार तर ७ कामगार गंभीर जखमी झाले. त्यापैकी काही कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे.

गेल्या वर्षी १३ जून २०२४ ला धामना येथील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीत फटाक्यांच्या वातीला लागणाऱ्या बारुदचा स्फोट झाला. या स्फोटतात ९ कामगारांचा भाजून मृत्यू झाला होता. त्यामध्ये काही महिला कामगारांचाही समावेश होता. मृत कामगार कंपनीच्या शेजारच्या तीन गावातील होते. गावात एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर १७ डिसेंबर २०२३ ला बाजारगावातील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत स्फोट झाला होता. या स्फोटातसुद्धा ९ कामगाराचा कोळसा झाला होता. मृतांमध्ये तब्बल ६ महिलांचा समावेश होता.

१२ ऑगस्ट २०२३ मध्ये इकोनॉमिक्स एक्सप्लोसिव्ह कंपनीत स्फोट झाला. या स्फोटात दोन कामगार ठार झाले. तसेच एमआयडीसीतील कटारिया अॅग्रो कंपनीत झालेल्या स्फोटात चार कामगारांचा मृत्यू झाला होता तर तीन कामगार गंभीररित्या भाजले होते. पूर्वीही आणखी काही बारुद कंपन्यांमध्ये स्फोट होऊन जिवीतहाणी झाली आहे. मात्र, अशा स्फोटाच्या घटनानंतरच प्रशासनाला जाग येते. त्यानंतरच खबरदारीच्या उपयायोजना राबविण्यात येतात.

कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष

कोंढाळीजवळील सोलार, चामुंडी आणि कोतवालबड्डीतील एशियन फायर वर्क्स, उमरेडमधील एमएमपी कंपनीत कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. कामगारांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नाहीत. एखादा स्फोट झाल्यानंतरच कंपन्या सुरक्षा उपाय करण्याचा देखावा करतात. बारुद निर्मिती कंपन्यांमध्ये कामगारांचा जीव नेहमी धोक्यात असतो. कंपनी व्यवस्थापन आणि शासनसुद्धा अशा घटनांकडे दुर्लक्ष करतात.