नागपूर : वाघ फक्त ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पातच दिसतात आणि याच व्याघ्रप्रकल्पाच्या बाहेर येऊन लोकांची वाट अडवतात, असाच गैरसमज आजवर होता. मात्र, पेंच व्याघ्रप्रकल्पातील वाघांनी हा गैरसमज खोडून काढला आहे. आता या व्याघ्रप्रकल्पातून सुद्धा वाघ बाहेर पडत असून पर्यटकांची नाही तर जंगलालगतच्या गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची वाट अडवत आहेत. पारशिवनी तालुक्यातील चारगाव येथील कुंवारा भिवसेन देवस्थानकडे जाणाऱ्या मार्गावर वाघाने पर्यटकांची वाट अडवली आणि त्यांना रस्त्यातूनच परतायला भाग पाडले.
हेही वाचा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या गृह जिल्ह्यातून गांजाची तस्करी?
नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्रप्रकल्पात वाघ इतक्या सहज पर्यटकांना दिसत नाहीत. गर्द आणि घनदाट या जंगलात व्याघ्रदर्शन झाले नाही, तरीही पर्यटक निराश होत नाहीत. कारण जंगलाचे सौंदर्य पर्यटकांना मोहात पाडणारे आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात मात्र पर्यटकांना व्याघ्रदर्शन सहज होते. अपवादात्मक स्थितीतच येथे येणारा पर्यटक व्याघ्रदर्शनाअभावी निराश होऊन जातो. इतर व्याघ्रप्रकल्पाच्या तुलनेत ताडोबात वाघांची संख्या अधिक असल्याने व्याघ्रप्रकल्पाबाहेरही सहज व्याघ्रदर्शन होते. जंगलालगतच्या गावांचा रस्ताही लागूनच असल्याने स्थानिक आणि वाघ कित्येकदा समोरासमोर येतात. या दोघांनाही एकमेकांची सवय झाल्याने ते आपआपल्या वाटेने मुकाट्याने जातात.
हेही वाचा : ४५ खासदार निवडून आणण्याचा संकल्प, राज्यातील सर्व जिल्ह्यांत एकाच दिवशी महायुतीचा महामेळावा
मात्र, पेंच व्याघ्रप्रकल्पाबाहेर वाघ सहजासहजी दिसून येत नाही. दोन दिवसांपूर्वी पेंचचा वाघही बाहेर आला. एवढेच नाही तर त्याने पारशिवणी तालुक्यातील चारगावची वाट धरली. अर्थातच तो रस्त्याच्या एका बाजूच्या जंगलातून दुसऱ्या बाजूच्या जंगलात जात होता. हा मार्ग कुंवारा भिवसेन देवस्थानाकडे जाणारा आहे. या मार्गावरुन एक कुटूंब त्यांच्या दुचाकीवरुन जात असताना अचानक रस्त्यालगतच्या जंगलातून वाघ डरकाळी फाेडत बाहेर आला.
दुचाकीस्वाराच्या हे ध्यानीमनीही नव्हते. वाघाची डरकाळी वाढत गेली आणि अचानक वाघ समोर आल्याचे पाहून त्यांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी तशीच दुचाकी परतवली आणि आले त्याच वेगाने ते परत गेले. वाघाने मात्र डरकाळी फोडतच त्याचा रस्ता ओलांडला आणि तो देखील जंगलाच्या दिशेने परत गेला. रामटेक येथील रमेश कारेमोरे व चारगाव येथील चंद्रशेखर राऊत यांनी हा घटनाक्रम चारचाकी वाहनातून टिपला.