नागपूर : कुणबी-मराठा, मराठा-कुणबी नोंदी शोधण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर मोहीम राबवण्यात येत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणानंतर शासनाने न्या. संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीने दिलेल्या अहवालानंतर शासनाने राज्यभर मराठा समाजाच्या दस्तावेजातील कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीच्या नोंदी शोधण्याची मोहीम सुरू केली होती. जिल्हा प्रशासनाकडून अधिकार अभिलेख, महसुली व शिक्षणाशी संबंधित नोंदी तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. याचा तपशील शुक्रवारपर्यंत शिंदे समितीला द्यायचा होता.
प्राप्त माहितीनुसार प्रशासनाकडून २३ लाख २२ हजार २८३ दस्तावेजांची तपासणी करण्यात आली. त्यात वर्ष १९१०-११ पासूनच्या दस्तावेजांचा समावेश आहे. तपासणीचे काम सुरूच आहे. आतापर्यंत तपासलेल्या एकूण २३ लाख २२ हजार दस्तावेजांपैकी २ लाख ३३ हजार ६५३ वर कुणबी तर केवळ ३५ दस्तावेजांवर मराठा – कुणबी तर ११ दस्तावेजांवर कुणबी-मराठा,अशी नोंद आढळून आली. या नोंदीवरून मराठा-कुणबी व कुणबी-मराठा अशा नोंदीचे प्रमाण जिल्ह्यात कमी असल्याचे स्पष्ट होते.