लोकसत्ता टीम
नागपूर: नागपुरात ऊन, ढगाळी वातावरण, अधून मधून पावसाने उकाडा वाढला आहे. त्यामुळे अनेकांना ‘व्हायरल इन्फेक्शन’चा त्रास होत आहे. त्यातच उन्हाळी सुट्यांमध्ये परराज्य आणि विदेशात फिरून आलेल्यांमध्ये सर्दी, खोकला, ताप ही व्हायरल इन्फेक्शन दिसत असल्याने वैद्यकीय क्षेत्रात चिंता वाढली आहे.
उपराजधानीत सध्या सकाळी कडक ऊन, दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण वाढले आहे. त्यातच जे उन्हाळी सुटी घालविण्यासाठी इतर राज्यात गेले, त्यापैकी अनेकांमध्ये परतल्यावर व्हायरल इन्फेक्शन दिसत असल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे. नागपुरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर म्हणाले, सध्या आमच्याकडे येणाऱ्या १०० पैकी २० रुग्णांचा इतिहास बघितला तर ते सुट्यांमध्ये बाहेर फिरून आले आहे.
अचानक वातावरण आणि खानपाणात बदलसह जिवाणू- विषाणूमुळे व्हायरल शक्य आहे. नागपुरातील तापमान ४० अंशाच्या जवळपास असून थंड हवेच्या ठिकाणी अचानक आपण कमी तापमानात जातो. सोबत खाण्याच्या पदार्थात बदल होते. त्याचा शरीरावर परिणाम होऊनही सर्दी, खकला, ताप शक्य आहे. या रुग्णांच्या कुटुंबीयांनी खबरदारी म्हणून एकही लक्षण दिसल्यास इतरांपासून लांब राहायला हवे, जेणेकरून इतरांना संक्रमण होणार नाही. सोबत डॉक्टरांच्या सल्याने उपचार घ्यावा. सध्या आढळणाऱ्या रुग्णांचे लक्षणे सौम्य आहेत. त्यात सर्दी, खोकला, ताप, घश्यात खवखव यापैकी एक वा अनेकांचा समावेश आहे. दरम्यान वाढत्या व्हायरल मध्ये हृद्य विकार, उच्चरक्तदाब, मधुमेह, किडनी, यकृताचा आजार, अवयव प्रत्यारोपण झालेल्या या जोखमीच्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.