नागपूर : विद्यमान आमदार आणि माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी १९९९ पासून चार वेळा उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. पण, २०१४ मध्ये भाजपचे डॉ. मिलिंद माने यांनी डॉ. राऊत यांचा पराभव केला होता. त्यावेळी बसपमधून किशोर गजभिये यांनी ५५ हजार मते घेतली होती. यंदाही डॉ. राऊत यांच्यासमोर भाजपसह ‘युवा ग्रॅज्युएट फोरम’चे अतुल खोब्रागडे, वंचित बहुजन आघाडी आणि बसपचे आव्हान राहणार असल्याने अनुसूचित जातीच्या मतांचे विभाजन होऊन काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे.
२०१४ च्या निवडणुकीत काय झाले होते
उत्तर नागपूरमधून राऊत पुन्हा लढतील, अशी शक्यता आहे. दुसरीकडे, ही जागा पुन्हा जिंकण्यासाठी भाजपनेही कंबर कसली आहे. २०१४ मध्ये दलित मतांचे विभाजन झाल्याने ही जागा भाजपने जिंकली होती. त्यावेळी बसपने काँग्रेसपेक्षा जास्त मते घेतली होती. काँग्रेसला २७.५४ टक्के आणि बसपाला ३०.३७ टक्के मिळाली होती, तर भाजपचे डॉ. मिलिंद माने यांनी ३७.९३ टक्के मते घेत विजय संपादन केला होता. यावरून अनुसूचित जातीच्या मतांचे विभाजन झाले तरच भाजपसाठी संधी निर्माण होऊ शकते, हे स्पष्ट आहे. हे समीकरण बघता भाजपधुरीण काय डावपेच आखतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, अतुल खोब्रागडे, वंचित बहुजन आघाडी आणि बसपच्या उमेदवारांचे आव्हान या मतदारसंघात राहणार आहे.
२०१९ मध्ये डॉ. राऊत यांना ८६ हजार मते मिळाली होती. बसपचे सुरेश साखरे २३ हजार तर वंचितचे विनय भांगे यांनी ५ हजर ५९९ मते घेतली होती. यात पुन्हा तिसरी आघाडी म्हणून पुढे आलेल्या खोब्रागडे यांचेही राऊत यांच्यासमोर आव्हान राहणार आहे. त्यामुळे याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा…भावी मुख्यमंत्री कोण हे तर फडणवीसांनीच स्पष्ट केले; आ. गायकवाड म्हणतात,‘बहीण, सामान्यांच्या…’
खोब्रागडेंमुळे तिहेरी लढतीची शक्यता?
गेल्या काही वर्षांत या मतदारसंघात बसपचा जनाधार कमी होत असल्याचे दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडीची येथे संघटनात्मक बांधणी नाही, तर रिपब्लिकन पक्ष (खोरिप) पासून देखील मतदार दूर गेेले आहेत. युवा ग्रॅज्युएटचे अतुल खोब्रागडे मागील पाच वर्षांपासून या मतदारसंघात तयारी करत असून दुरावलेल्या आंबेडकरी समाजातील महिला, निवृत्त कर्मचारी आणि तरुण मतदारांसाठी त्यांनी रणनीती आखली आहे. याशिवाय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्येही खोब्रागडे यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. त्यामुळे खोब्रागडेंमुळे उत्तर नागपूरमध्ये तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा…राजेंद्र शिगणे तुतारी फुंकणार, शरद पवार गटात परतीचा मुहूर्त ठरला!
‘मविआ’तील जागा वाटपातील मतभेदाचे केंद्रबिंदू नागपूर
महाविकास आघाडीतील जागा वाटपावरून काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे) यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले असून त्याचे केंद्रबिंदू विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील दोन जागा ठरल्या आहेत. नागपूर ग्रामीण आणि शहरातील दक्षिण नागपूर या त्या दोन जागा आहेत. त्यावर दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. रामटेक हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने ही जागा आम्हीच लढवणार तसेच शहरात एक जागा हवी म्हणून दक्षिण नागपूर काँग्रेसने आमच्यासाठी सोडावी, अशी आग्रही मागणी शिवसेनेची आहे. दुसरीकडे, रामटेक आणि दक्षिण नागपूर या दोन्ही जागा आतापर्यंत काँग्रेसच लढवत आली आहे. २०१९ मध्ये दोन्ही ठिकाणी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता. त्यामुळे नैसर्गिकरित्या या जागांवर काँग्रेसचाच दावा आहे, असे काँग्रेस नेत्यांचे दावे आहे. दोन्ही मतदारसंघात काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी मागील काही वर्षांपासून तयारी सुरू केली आहे. त्यामुळे या जागा सोडण्यास दोन्ही पक्षांची तयारी नाही.