नागपूर : शहरातून संपूर्ण विदर्भात ड्रग्स विक्रेत्यांचा सुळसुळाट झाला असून पोलिसांच्या नाक्कावर टिचून शहरात गांजा, एमडी आणि ब्राऊन शुगर नागपुरात विक्री केल्या जात आहे. ड्रग्सचे सेवन करणाऱ्यांची संख्याही वाढल्याने नागपुरातून कोट्यवधीची उलाढाल होत आहे. कुरिअरद्वारे मागविलेल्या अमली पदार्थाचे (गांजा) पार्सल घेण्यासाठी आलेल्या दोघांना अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. करण पोथीवाल (३१) रा. मानेवाडा, शाहरुख खान (२९) रा. बंगालीपंजा अशी अटकेतील तस्करांची नावे आहेत. अजिंक्य नागदेवनेसाठी हा म्होरक्या असून त्याच्यासाठी दोघेही काम करीत असल्याचे पोलीस तपासात झाले.
शहरात रेल्वे आणि रस्ते मार्गाने गांजा येतो. पोलिसांनी कारवाई करून तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. शेकडो किलो गांजा हस्तगत केला आहे. अनेक तस्करांना कारागृहातही कोंडले. आता राजरोसपणे कुरिअरद्वारे गांजाचे पार्सल मागविल्याने तस्करांना सहज आणि सोयीचे झाले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनेक वर्षांपासून कुरिअरद्वारे अमलीपदार्थांचे पार्सल मागविण्यात येत असून त्याची विक्री केली जाते.
हेही वाचा : विधानसभेची नांदी, नव्या उमेदवाराला संधी… काँग्रेस दक्षिण नागपूरमध्ये…
अमलीपदार्थ विरोधी पथक प्रतापनगर पोलिस ठाण्याअंतर्गत पेट्रोलिंगवर असताना जयताळा मार्गावरील हिंदनगर येथे एक्सप्रेस ब्रिज नावाच्या कुरिअरमधून दोन युवक अमलीपदार्थाचे पार्सल घेण्यासाठी येणार असल्याने पथकाने सापळा रचला. करण आणि शाहरूख कारने आले. त्यांनी पार्सल घेतले आणि कारमध्ये ठेवले. त्याच वेळी पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी केली. खरड्याच्या मोठ्या २२ किलो ७१० ग्रॅम हिरव्या रंगाचा गांजा (किंमत ४ लाख ५४ हजार) आढळला. आरोपींच्या ताब्यातून गांजा, तीन मोबाईल, कार असा एकूण ६ लाख ५४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे, उपायुक्त निमीत गोयल आणि सपोआ डॉ. अभिजित यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ललिता तोडासे, मनोज घुरडे, सिद्धार्थ पाटील, मनोज नेवारे, शैलेश डोबाले, विवेक अढाऊ, पवन गजभिये यांनी केली.
हेही वाचा : बुलढाणा: सायबर गुन्हेगाराचे गुजरात कनेक्शन; आरोपी वडनगर…
५८ हजारांची एमडी पावडर जप्त
गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने एमडी पावडर बाळगणार्यास पकडले. ही कारवाई लकडगंज पोलिस ठाण्याअंतर्गत आदर्शननगरात करण्यात आली. हासिम शेख (२२) रा. गरोबा मैदान अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याच्या जवळून ५८ हजार ३०० रुपये किंमतीची एमडी पावडर हस्तगत करण्यात आली. गोलू बोरकर रा. नंदनवन याच्या मदतीने अमलीपदार्थाची खरेदी विक्री करीत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. लकडगंज ठाण्यात गुन्हा नोंदवून हासिमला अटक करण्यात आली. पोलीस गोलूचा शोध घेत आहेत.