नागपूर : उत्तर आणि पूर्व नागपूरला जोडणारा पाचपावली उड्डाणपूल जीर्ण झाला असून त्याच्या चुकीच्या ‘लँडिंग’मुळे गोळीबार चौकातील वाहतुकीच गणितच बदलले आहे. डागा रुग्णालयाकडून पाचपावलीकडे जाताना गोळीबार चौकातूनच पाचपावली उड्डाणपुलाला सुरुवात होते. ब्रिटिशांच्या काळात येथे दारू विक्रीच्या विरोधात आंदोलन झाले होते. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तेथे अनेकांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून या चौकाला गोळीबार चौक असे नाव पडले. स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास असलेल्या या चौकाची सध्याची अवस्था दयनीय झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हातठेले आणि फुटकळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. या चौकातून पाचपावली, मस्कासाथ, मोमीनपुरा आणि डागा रुग्णालय-महालकडे जाणारे रस्ते आहेत. हा चौक ऑटो, रिक्षा आणि मालवाहतूक वाहनांसाठी पार्किंगची हक्काची जागा झाली आहे. गोळीबार चौकात स्मारक बांधण्यात आले असून त्या स्मारकाचे सौंदर्य नेत्यांच्या जाहिरात, शुभेच्छा फलकांनी झाकोळले आहे. रस्ता दुभाजकावरसुद्धा जाहिरात फलकांची गर्दी असून ते वाहनचालकांसाठी अडचणीचे ठरत आहेत.

हेही वाचा…८० नव्हे ८५ वर्षांवरील ज्येष्ठांना घरपोच मतदानाची सुविधा; सुधारित आदेश काय? जाणून घ्या

वाहतूक नियम नावालाच

वाहतूक शाखेतील एकही पोलीस कर्मचारी गोळीबार चौकात वाहतूक नियंत्रणासाठी हजर दिसत नाही. ते रस्त्याच्या कडेला घोळका करून केवळ वसुलीवर भर देतात. त्यामुळे वाहतूक नियमांची येथे सर्रास पायमल्ली होताना दिसून येते. गोळीबार चौकात अनेक हॉटेल्स, बार आणि अनेक मोठी दुकाने असून त्यांच्यासोबत वाहतूक पोलिसांचे आर्थिक संबंध आहेत. ते जोपासण्यासाठी पोलीस या चौकातील वाहतुकीकडे दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा आहे.

हातठेलेवाल्यांची गर्दी

गोळीबार चौकाकडून पाचपावलीकडे जाण्यासाठी उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली. उड्डाणपुलामुळे वाहनांची मोठी गर्दी गोळीबार चौकात होते. सायंकाळच्या सुमारास चौकातून हाकेच्या अंतरावर असलेल्या पुलावर जाण्यासाठी २० ते ३० मिनिटे लागतात. चौकात हातठेल्यांची मोठी गर्दी आहे. भाजीपाला, चायनीज पदार्थ विक्रेत्यांनी रस्त्याच्या कडेलाच दुकाने थाटली आहेत. चौकात ऑटोचा अनधिकृत थांबा आहे.

हेही वाचा…“टोईंग व्हॅनमधील युवकांना आवरा हो…”, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहशहरात पोलीस सुरक्षेत करताहेत गुंडगिरी; वाहनचालकाला मारहाण

खोदलेला रस्ता आणि एकतर्फी वाहतूक

डागा इस्पितळाकडून गोळीबार चौकात येणारा एका बाजूचा संपूर्ण रस्ता खोदलेला आहे. त्यामुळे एकाच रस्त्यावरून वाहनांची ये-जा सुरू आहे. या रस्त्यावर अर्धा किमी वाहनांच्या रांगा लागतात. यातच चौकात झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. तसेच याच ठिकाणी एका नेत्याचे जनसंपर्क कार्यालय असून तेथे येणारे रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्याचाही फटका वाहतुकीला बसतो.

नागरिक काय म्हणतात?

“ ऐतिहासिक वारसा प्राप्त गोळीबार चौकाला आज कुणीही वाली नाही. येथे नेहमी वाहतूक कोंडी होते. पाचपावली पुलावर जाताना खूप मनस्ताप सहन करावा लागतो. चौकात कधीच वाहतूक पोलीस तैनात दिसत नाहीत.” – उमेश भोगे, शिक्षक.

हेही वाचा…बुलढाणा : खामगाव – जालना रेल्वेमार्गावर मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब

पोलीस काय म्हणतात?

सध्या मेट्रो आणि रस्त्याच्या कामामुळे अनेक रस्ते खोदलेले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होते. ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलीस तैनात केले आहेत. – संतोष वैरागडे, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur due to wrong landing of pachpaoli bridge and encroachment of hawkers traffic jam at golibar chowk adk 83 psg