नागपूर : तुकडोजी पुतळा मार्गावर भरधाव कारने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी होऊन एका ई-रिक्षा चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. व्हॉट्सअॅपवर घटनेचा फोटो व्हायरल झाल्यामुळे रिक्शा चालकाच्या पत्नीला अपघाताची माहिती मिळाली. तिने मेडिकल रुग्णालय गाठून पतीच्या मृतदेहाची ओळख पटवली. सुनील ताराचंद मेश्राम (४५) रा. नवीन बाबुलखेडा, असे मृताचे नाव आहे.
सुनील गत काही वर्षांपासून ई-रिक्षा चालवत होते. त्यांची पत्नी रजनी ही सुद्धा काम करते. त्यांना आयुष नावाचा १७ वर्षांचा मुलगा ही आहे. शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास सुनील ई-रिक्शाने तुकडोजी पुतळ्याकडे जात होते. वंजारीनगरात जीआरपी पेट्रोल पंपाजवळ कार क्र. सीजी-०४/डीवाय-२०११ च्या चालकाने त्यांच्या रिक्षाला जबर धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, सुनील रिक्शासह बऱ्याच दूर जाऊन पडले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. रिक्षाचेही दोन तुकडे झाले. आरोपी चालक वाहन तेथेच सोडून पसार झाला. स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.
हेही वाचा : भिडेना कारागृहात चक्की पिसायला लावणार – वडेट्टीवार
सुनील यांना उपचारार्थ मेडिकल रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सुनील यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना करण्यात आला. दरम्यान अपघाताचा फोटो व्हॉट्सअॅपवर व्हायरल होऊ लागला. एका नातेवाईकाने रजनीला अपघाताचा फोटो दाखवला. रजनीने सुनीलची रिक्शा ओळखली. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ती ताबडतोब मेडिकल रुग्णालयात पोहोचली. शवविच्छेदन कक्षात ठेवलेला मृतदेह त्यांच्या पतीचाच होता. पोलिसांनी कार चालकावर गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे.