लोकसत्ता टीम
नागपूर: केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या शहरात ई- रिक्षा चालकांकडून नियम धाब्यावर बसवून क्षमतेहून दुप्पट प्रवासी वाहतूक आणि मालवाहतूक केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.
जिल्हा परिवहन समितींकडून ई- रिक्षा वाहतुकीसाठी मार्ग निश्चित करून देण्यात आले आहेत. त्यानंतरही नागपुरात नियम धाब्यावर बसून सर्रास महामार्गावरही रिक्षाची प्रवासी व मालवाहतूक केली जात आहे. हा प्रकार शहरातील विविध रस्त्यांवर दिसत असतानाही शहर वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कोणतीच कारवाई होत नसल्यामुळे त्यांचे ई रिक्षाच्या नियमबाह्यकृतीला समर्थन आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा… नागपूर: प्रेमविवाह केल्याचा राग; सासऱ्यासह तिघांचा जावयावर प्राणघातक हल्ला
दरम्यान, येथे क्षमतेहुन दुप्पट प्रवासी वाहतूक तसेच प्रवासी ई रिक्षावर जास्त वजनांची मालवाहतूक केली जात असल्याने शहरात सर्वत्र अपघाताचाही धोका वाढला आहे. या अपघातात कुणाचा जीव गेल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे.