नागपूर : नागरिकांना फिरण्यासाठी आणि मुलांना खेळण्यासाठी आवश्यक उद्याने संकटात सापडले आहेत. काही उद्याने विकासाच्या नावावर बंद करण्यात आली आहे तर काहींवर अतिक्रमण केले जात आहे. अंबाझरी, दत्तात्रयनगर उद्यानात विकासकामे सुरू असल्याने बंद आहे. सावकरनगर उद्यानात फूड प्लाझा परवानगी देऊन उद्यान संकुचित केले जात आहे. तर उत्तर नागपुरात नारा प्रस्तावित उद्यानाच्या जागेवर बांधकाम व्यावसायिकांचा डोळा आहे. अंबाझरी उद्यान गेल्या पाच वर्षांपासून बंद आहे. उद्यानातील लहान मुलांचे खेळाचे साहित्य मोडकळीस आले आहे. पायी चालण्यासाठी असलेल्या मार्गाचे नुकसान झाले आहे. उद्यानातील हिरवळ नष्ट झाली आहे. या उद्यानाजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन होते. या परिसरात खासगी कंपनीद्वारे विकास करण्याचे योजना होती. त्यामुळे हे उद्यान बंद करण्यात आले. आता तो प्रकल्प रद्द झाला. परंतु, उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात आले नाही. त्यामुळे अंबाझरी शेजारील वसाहतीमधील नागरिकांची गैरसोय होत आहे.
हेही वाचा : विद्यापीठाच्या परीक्षा शुल्कात मोठी वाढ होणार,विद्यार्थ्यांवर भूर्दंडाची ही आहेत कारणे
दत्तात्रयनगर उद्यान मागील दीड वर्षांपासून बंद आहे. या उद्यानामध्ये मोगरा, मधू मालती, सोनचाफा, जाई जुई, चमेली, रांझाई, रातराणी, पारिजात, देशी गुलाब यासारख्या सुगंधित फुलांची झाडे लावण्याचे काम सुरू आहे. त्यावर दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. उद्यानाचे काम सुरू असल्यामुळे नागरिकांना येथे प्रवेश बंदी आहे. संथगतीने सुरू असलेल्या कामाबद्दल आयुक्त डॉ. चौधरी यांनी नाराजी व्यक्त केली. खामला चौकाजवळील सावरकरनगर उद्यानामध्ये परिसरातील नागरिक सकाळी, सायंकाळी फिरण्यासाठी येतात. तसेच उद्यानात योगा, व्यायाम करतात. तसेच लहान मुले खेळतात, बागडतात. परंतु, येथे ‘फूड प्लाझा’ला परवानगी देण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा : पाच राज्ये अन् चार हजार कि.मी.चा प्रवास; ताडोबातील गिधाड तामिळनाडूत
उत्तर नागपुरातील मौजा नारा येथे मोठा भूखंड उद्यानासाठी राखीव आहे. परंतु राज्य सरकार गेल्या अनेक वर्षांपासून ही जमीन अधिग्रहित करीत नाही. आता या जागेवर काही बांधकाम व्यावसायिकांचा डोळा आहे. या जमिनीचा वापर बदलण्याचा घाट असल्याचा आरोप अनेक संघटनांनी केला आहे.
कामांचे ‘ऑडिट’ होणार
दत्तात्रनगर उद्यानात सुरू असलेल्या कामाचे त्रयस्थांकडून ऑडिट करण्याचे आणि नागरिकांसाठी उद्यान सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.