नागपूर : शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ५ ते १० लाख रुपयांनी लुबाडणाऱ्या अनेक टोळ्या सक्रीय झाल्या आहे. नुकताच एका उच्चशिक्षित बेरोजगार युवकाला नोकरी लावून देण्याच्या नावाने एका टोळीने १ लाख ८३ हजार रुपये उकळले. त्याला एका शासकीय कार्यालयात नोकरी लागल्याबाबत नियुक्तीपत्रसुद्धा दिले. तो युवक नियुक्तीसाठी शासकीय कार्यालयात गेला असता तेथील अधिकाऱ्यांनी त्याला हाकलून दिले. त्यामुळे बनावट नियुक्तीपत्र देणाऱ्या टोळीचे बिंग फुटले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तक्रारीवरुन मानकापूर पोलिसांनी टोळीच्या म्होरक्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. रजत गुप्ता (४०) रा. गोधनी असे आरोपीचे नाव आहे. आरोपी रजत गुप्ता हा कोराडी औष्णिक केंद्रात कंत्राटी पध्दतीवर सुरक्षारक्षक म्हणून कामाला होता. तो नेहमीच मानकापूर ठाण्याअंतर्गत फरस परिसरातील एका चहाच्या दुकानावर थांबत होता.

त्याच ठिकाणी फिर्यादी निलकचंद तांडेकर (५०) रा. मानकापूर यांचा मुलगासुध्दा जायचा. त्यामुळे आरोपी रजत सोबत ओळख होती. फिर्यादीचा मुलगा कामाच्या शोधात असल्याची माहिती आरोपीला मिळाली. त्याने कोराडी औष्णिक केंद्रात सुरक्षा अधिकारी असल्याची त्याने बतावणी केली. तसेच ‘या ठिकाणी सुरक्षारक्षक पदासाठी भरती होत आहे. तुला नोकरीवर लागायचे असेल तर काही खर्च करावे लागेल.’ पीडित युवक त्याच्या जाळ्यात अडकला. त्याने वडिलांना सांगितले.

हेही वाचा : नागपूर : एचएमपीव्ही विषाणूचा धोका वाढला! उच्च न्यायालयाला हस्तक्षेप…

निलकचंद हे समोसे विकतात. त्यांच्या मुलाने बीसीएचे शिक्षण घेतले. सध्या नोकरी नसल्याने तो वडिलांच्या कामात मदत करतो. मुलाला नोकरी मिळत असल्याने वडिलही आनंदी होते. रजतने रिझर्व्ह बँकेत चालान भरायची आहे, अशी थाप मारून वेळोवेळी पीडित कुटुंबाकडून एक लाख ८३ हजार रुपये घेतले.

पीडित युवक त्याला नोकरी संदर्भात विचारणा करायचा. आरोपी रजत दरवेळी नवीन माहिती सांगून वेळ मारून नेत होता. आठ महिने लोटल्यानंतरही नोकरी मिळत नसल्याने पीडित युवकाने तगादा लावला. त्यामुळे रजतने त्याला बनावट नियुक्तीपत्र दिले. आनंदात असलेला युवक नियुक्तीपत्र घेऊन औष्णिक वीज केंद्रात गेला. संबधीताने ते पत्र पाहिले. ‘आमच्या कार्यालयाचे हे नियुक्तीपत्र नाही.’ असे म्हणताच पीडित युवक निराश झाला. फिर्यादीच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी आरोपी विरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

हेही वाचा : नागपूर : वाघांचा रस्ता अडविला; न्यायालयाकडून गंभीर दखल…

टोळ्यांचे अधिकाऱ्यांशी संबंध

यापूर्वी पोलिसांनी अटक केलेल्या टोळ्यांमधील काही सदस्यांचे शासकीय अधिकाऱ्यांशी मधूर संबंध असल्याचे पुढे आले होते. त्यामुळे आरोपी रजत गुप्ताचेही काही शासकीय अधिकाऱ्यांशी संबंध आहेत का? याचा तपास मानकापूर पोलीस करीत आहेत. रजतने घेतलेल्या पैशात आणखी कुणाचा वाटा आहे का? याबाबत पोलीस शोध घेत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur fake appointment letters of government jobs given for rupees 1 lakh 83 thousand scam revealed adk 83 css