नागपूर : कार्यालयात देहव्यापाराचा अड्डा सुरू केल्याप्रकरणी ‘लॉकअप’मध्ये बंद असलेल्या आरोपीच्या पत्नीकडून तोतया महिला वकिलाने वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नावाने एक लाख १० हजार रुपयांची खंडणी घेतली. या प्रकरणाची कुणकुण ठाणेदाराला लागताच त्या तोतया वकील महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. रेणुका अमित तिवारी (३०, टेम्पलबाजार रोड, सीताबर्डी) असे आरोपी महिलेचे नाव आहे. आरोपी जय जोशी हा आलू-कांद्याचा व्यापारी असून त्याने कॉटन मार्केटमधील कार्यालयात काही महिलांकडून देहव्यापार सुरू केला होता.
देहव्यापारातून कमाई जास्त असल्यामुळे तो काही तरुणींना कार्यालयात कामाला ठेवून देहव्यापार करीत होता. या अड्ड्यावर पोलिसांनी छापा घालून जय जोशीला अटक केली. तो ७ मेपर्यंत गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या ‘लॉकअप’मध्ये होता. ५ मे रोजी आरोपी रेणुका अमित तिवारी ही गणेशपेठ पोलीस ठाण्यात पोहचली. तिने पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली आणि स्वत: वकील असल्याचे सांगितले. तिने अटकेतील आरोपी जय जोशी याच्याशी बोलण्याची परवानगी घेतली. त्यानंतर तिने जोशीसोबत संवाद साधला. त्याला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला पैसे देऊन लॉकअपमधून सुटका करण्याचे आमिष दाखवले. कागदपत्र तयार करण्यासाठी तिने जोशी यांची पत्नी नेहा हिचा भ्रमणध्वनी क्रमांक घेतला. नेहा यांना फोन केला असता ‘तुझ्या पतीला लॉकअपमधून सोडवतो. त्यासाठी १ लाख १० हजार रुपये वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला द्यावे लागतील, अन्यथा पोलीस तुलाही अटक करतील,’ अशी भीती दाखवली. घाबरलेल्या नेहाने काही दागिने सराफाकडे गहाण ठेवून पैसे गोळा केले आणि रेणुका तिवारी हिला दिले.
हेही वाचा : नागपूर : मोकळ्या मैदानात मांडव टाकून जुगार! १२ जुगारी; २१ लाखांचा माल…
अशी केली फसवणूक
रेणुका तिवारीने नेहाला गणेशपेठ पोलीस ठाण्यासमोर थांबवले. ती स्वत: पोलीस ठाण्यात गेली. कुण्यातरी पोलीस कर्मचाऱ्याशी बोलून काही वेळात ती परतली. ‘आता तुझा पती सायंकाळी सुटेल. पोलिसांना मी पैसे दिले आहे. आता मला फोन करू नको.’ असे सांगितले आणि दुचाकीने निघून गेली. रात्र झाल्यानंतरही पती ठाण्यातून न सुटल्याने नेहाने तिला फोन केला. मात्र, तिचा भ्रमणध्वनी बंद येत होता. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
हेही वाचा : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांची अटक अटळ, अटकपूर्व जामीन नामंजूर
अशी आली घटना उघडकीस
रेणुका तिवारी पैसे घेऊन पळाल्यानंतर नेहा ही पतीला भेटायला पोलीस ठाण्यात आली. त्यावेळी ठाणेदाराने त्यांच्याशी संवाद साधला असता रेणुकाने खंडणी घेतल्याचा प्रकार समोर आला. रेणुकाने यापूर्वीसुद्धा जरीपटका पोलीस ठाण्यात आरोपीच्या नातेवाईकांकडून खंडणी वसुली केली. जरीपटका ठाण्यातसुद्धा रेणुका तिवारीवर गुन्हा दाखल आहे. रेणुकाला गणेशपेठ पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली आहे.