नागपूर : उच्चशिक्षित मुलीचे आंतरजातीय युवकाशी प्रेमसंबंध होते. मुलीने त्या युवकाशी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेत घरातून पळ काढला. मात्र, वडील व काकाने तिचे अपहरण करण्याचा कट रचला. मुलीचे कारमध्ये कोंबून अपहरण केले. मात्र, गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांनाही चंद्रपूरमधून अटक केली. रवींद्र पोम (५२), वनदिश (४२), संतोष पोम ( ३८ रा. तेलंगणा) अशी तिन्ही आरोपींची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा (काल्पनिक नाव) ही नागपुरातील एका कंपनीत प्रशिक्षणार्थी अधिकारी असून, तिचा प्रियकर मनोज हा हैदराबादमधील एका सॉफ्टवेअर कंपनीत मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. श्रद्धा व मनोजचे एकमेकांवर प्रेम जडले. मनोजने श्रद्धाच्या कुटुंबाकडे लग्नाबाबत विचारणा केली. श्रद्धाच्या नातेवाइकांनी लग्नास नकार दिला. त्यानंतर श्रद्धा व मनोजने पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. ऑक्टोबर २०२३मध्ये दोघांनीही घरातून पळ काढला आणि प्रेमविवाह केला. लग्नानंतर दोघेही नागपुरातील गिट्टीखदान परिसरात राहायला आले. मनोज हा घरूनच कंपनीचे काम करायला लागला. लग्नानंतर श्रद्धाचे नातेवाईक हे मनोजला धमकीचे फोन करीत होते. श्रद्धालाही ते धमकी देत होते. मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास श्रद्धा ही घरासमोर भाजीपाला खरेदी करीत होती. यावेळी तिन्ही आरोपी तेथे आले. तिघेही कारमधून उतरले. त्यांनी तोंड दाबून श्रद्धाला बळजबरीने कारमध्ये बसविले.

हेही वाचा : “उच्च न्यायालयातही उद्धव ठाकरे यांच्या पदरी निराशाच येईल”, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे भाकीत; म्हणाले…

श्रद्धाला वाचविण्यासाठी मनोज धावला. दोघांनी धक्का देत मनोजला खाली पाडले व श्रद्धाला कारने घेऊन पसार झाले. मनोजने गिट्टीखदान पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. नागपूर पोलिसांनी चंद्रपूर पोलिसांना घटनेची माहिती दिली. चंद्रपूर पोलिसांनी नाकाबंदी करून कार अडवून तिघांना अटक करीत श्रद्धाची सुटका केली. नंतर तिघांना गिट्टीखदान पोलिसांच्या स्वाधीन केले. या अपहरण प्रकरणामुळे गिट्टीखदान आणि चंद्रपूर पोलिसांची चागंलीच तारांबळ उडाली होती. मात्र, आरोपींमध्ये कुटुंबिय असल्यामुळे पोलिसांची जीव भांड्यात पडला होता. मात्र, गुन्ह्याचा छडा लागल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास घेतला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur father kidnapped his daughter who did inter caste marriage with boyfriend adk 83 css
Show comments