नागपूर : नागपूरमध्ये एका बापाने रागाच्या भरात आपल्या परवाना असलेल्या बंदूकीतून मुलाच्या पायावर गोळी झाडली. यात मुलगा गंभीररित्या जखमी झाला. याप्रकरणी सुनेने आपल्या सासऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार केली. हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास पूर्ण करत आरोपी वडिलांविरोधात आरोपपत्रही दाखल केले. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले.

काय घडले?

नागपूरच्या बेसा परिसरातील चिंतामणीनगर येथे ६९ वर्षीय वडील राहतात. त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा आणि सूनही राहते. वडील आणि मुलामध्ये एका विषयावरून जोरदार भांडण झाले. यानंतर वडिलांनी रागाच्या भरात त्यांच्याकडे असलेली परवानाधारक बंदूक बाहेर काढली आणि मुलाच्या पायावर गोळी झाडली. या घटनेत मुलगा गंभीररित्या जखमी झाला. सुनेने या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे केली. अजनी पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहितेचे कलम १०९ आणि शस्त्र कायद्याचे कलम २५ नुसार वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला. हा गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयात याप्रकरणी न्या.विनय जोशी आणि न्या.अभय मंत्री यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली. आरोपी वडिलांच्यावतीने ॲड.के.वाय.मंडपे यांनी बाजू मांडली. पोलिसांच्यावतीने ॲड.धोटे तर तक्रारदार सूनेच्यावतीने ॲड.आर.जी.नितनवरे यांनी युक्तिवाद केला.

हेही वाचा…वंचितला मोठा धक्का…अधिकृत उमेदवाराची माघार…आता काँग्रेसला…

गुन्हा रद्द का झाला?

उच्च न्यायालयाने गुन्हा रद्द करताना महत्वपूर्ण निरीक्षण नोंदविले. बंदूकसारख्या धोकादायक शस्त्राचा वापर करणे अत्यंत चिंतादायक बाब आहे. मात्र आपल्याला ही बाब पण लक्षात घ्यायला हवी की वडील आणि मुलगा हे अत्यंत जवळचे नाते आहे. एका कौटुंबिक वादामुळे, वडिलांनी रागाच्या भरात मुलाच्या पायावर गोळी झाडली. या घटनेनंतर मुलगा सुमारे २० ते २५ दिवस रुग्णालयात राहिला. इतके दिवस रुग्णालयात असल्यामुळे मुलाला त्याची नोकरीही गमवावी लागली पण वडिलांनी या सर्व काळात मुलाची काळजी घेतली आणि नोकरी गेल्यावर त्याचे संगोपणही करत आहेत, असे मत न्यायालयाने निर्णय देताना नोंदविले. याप्रकरणी मुलाने आणि सूनेने वडिलांवरील गुन्हा रद्द करण्यात आक्षेप नसल्याचे शपथपत्र दाखल केले आहे. त्यामुळे हे प्रकरण पुढे चालविणे योग्य नाही, असे मत नोंदवित न्यायालयाने गुन्हा रद्द केला. याप्रकरणी पोलिसांनी बंदूक जप्त केली असून परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Story img Loader