नागपूर : दुचाकीने कर्तव्यावर जाणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्याला नॉयलान मांजा गुंडाळल्या गेला. नॉयलान मांजाने थेट नाकाजवळ अडकल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्याचे नाक चिरल्या गेले. तिने लगेच दुचाकी थांबवून डोक्याला गुंडाळेला मांजा काढला. मात्र, रक्तबंबाळ चेहरा झाल्यामुळे नागरिकांनी लगेच तिला खासगी रुग्णालयात नेले. ही घटना मकरसंक्रांतीच्या दिवशी (मंग‌ळवारी) सीताबर्डीत घडली. शीतल खेडकर असे जखमी महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल खेडकर या सीताबर्डी पोलीस ठाण्यात अंंमलदार आहे. आज दुपारी २ वाजता त्या दुचाकीने कर्तव्यावर जात होत्या. दरम्यान, रस्त्यावरील एका खांबावर अडकलेला नॉयलान मांजा शीतल यांच्या डोक्याला गुंडा‌ळल्या गेला. त्यामुळे त्यांनी हाताने मांजा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो मांजा शीतल यांच्या नाकाला घासल्या गेला. त्यामुळे शीतल यांचे नाक चिरल्या गेले. रक्ताची धार बघून त्यांनी रस्त्याच्या कडेला दुचाकी थांबवली. त्यांनी डोक्याला गुंडाळलेला मांजा बाजुला केला.

हेही वाचा : नागपूर : बुटीबोरी पूलप्रकरणी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह, साडेतीन वर्षांत पुलास तडे

काही नागरिकांनी लगेच मदतीसाठी धाव घेतली. शीतलला बाजुला असलेल्या लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या शीतलवर उपचार सुरु असून प्रकृती ठिक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, नाक जास्त प्रमाणात चिरल्या गेल्यामुळे टाके लावून सुटी देण्यात येणार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा : एसटी बँक लाच प्रकरणात महत्वाची अपडेट… तर घबाड बाहेर येईल

दुचाकीचालकासह नागरिकांना फटका

मकरसंक्रांतीला शहरात पतंगाने आकाश सजले होते. शासनाने प्रतिबंधित असलेला नॉयलान मांजाही अनेकांकडे उपलब्ध होता. पोलिसांनी नॉयलान मांजा वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पोलिसांच्या आव्हानाला न जुमानता अनेकांनी नॉयलान मांजाने पतंग उडविला. त्याचा फटका शहरात बऱ्याच दुचाकीचालकांना आणि वाटसरुंना बसला. शीतल खेडकर या पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोक्याला गुंडाळलेला मांजा सुदैवाने गळ्यापर्यंत पोहचला नाही. अन्यथा गळा चिरल्या गेला असता. शहरातील नॉयलान मांजा आता अनेकांच्या जीवावर उठला असल्याचे अनेकांचे मत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur female police constable injured due to nylon manja adk 83 css