नागपूर : जिल्ह्यात २४ तासांत करोनाचे ९ नवीन रुग्ण आढळले असून एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. करोनाच्या नवीन लाटेत प्रथमच मृत्यू नोंदवण्यात आल्याने आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार, दगावलेला ८२ वर्षीय पुरुष मानकापूर परिसरातील होता. त्याला हृदयविकाराचा त्रास होता. प्रकृती खालवल्याने ३ जानेवारीला मेयोत दाखल करण्यात आले. ४ जानेवारीला त्यांना करोना असल्याचे निदान झाले. शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, २४ तासांत शहरात ८, ग्रामीणला १ असे एकूण ९ नवीन रुग्ण आढळले. दिवसभरात शहरात ७, ग्रामीणला १ असे एकूण ८ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे शनिवारी एकूण ५२ सक्रिय करोनाग्रस्त नोंदवले गेले.
हेही वाचा : वर्धा : गांजाची शेती चक्क गच्चीवर
नागपूरमध्ये जेएन.१ चे २९ रुग्ण नवे रुग्ण सापडल्याने तेथील रुग्णांची संख्या ३०, तर राज्यातील जेएन. १ रुग्णांची संख्या १३९ झाली आहे. २५ ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यान केलेल्या जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेन्सिंग) च्या अहवालानुसार राज्यात जेएन.१ चे २९ नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच शनिवारी राज्यात करोनाचे १५४ नवे रुग्ण सापडले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यात एक नागपूरचा रुग्ण आहे.