नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) चमूने नागपुरातील दोन गोदामांवर छापे मारले. याप्रसंगी चार वेगवेगळ्या प्रतिष्ठानच्या मालकीच्या असलेल्या २ कोटी ६० लाख ६५ हजार २४ रुपयांच्या सडकी सुपारीचा साठा संशयावरून जप्त करण्यात आला. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे नागपुरात सडकी सुपारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात होत असल्याची तक्रार आली. मंत्र्यांनी अन्न सुरक्षा आयुक्त अभिमन्यू काळे यांना कारवाईची सूचना केली. त्यावरून काळे यांनी ‘एफडीए’च्या गुप्तवार्ता विभागाला कामावर लावले.
त्यावरून सहआयुक्त समाधान पवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक आयुक्त (गुप्तवार्ता) आनंद महाजन आणि चमूने नागपूरच्या कळमनातील मे. प्रीती इंडस्ट्रिज आणि लिहीगाव (कामठी) येथील मे. फार्मेको कोल्ड चेन ॲन्ड लाॅजिस्टिक लिमिटेड येथे छापा मारला. त्यात या दोन्ही गोदामात नागपुरातील इतवारी परिसरातील मे. विनस ट्रेडर्स, मे. आर.आर. ब्रदर्स, मे. टी.एम. इंटरप्राइजेस, मे. इमरान सुपारी ट्रेडर्स या प्रतिष्ठानचा ७२ हजार ८१० किलो सुपारीचा साठा आढळला. ही कमी दर्जाची सडकी सुपारी असल्याच्या संशयावरून हा साठा जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचा : आता जंगलातला वाघ अवघ्या ३० सेकंदात मोबाईल आणि संगणकावर येणार, काय आहे हे ‘ट्रेलगार्ड एआय’ तंत्रज्ञान
त्यातील काही नमुने प्रयोगशाळेत तपासणीला पाठवण्यात आले असून अहवालानंतर पुढील कारवाई होणार असल्याचा ‘एफडीए’चा दावा आहे. या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता) यदूराज दहातोंडे, राजेश यादव, संदीप सूर्यवंशी, पीयूष मानवतकर, स्मिता बाभरे, अमर सोनटक्के यांचीही भूमिका महत्त्वाची आहे.